घरमहाराष्ट्रमाझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार

माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार

Subscribe

यवतमाळ मी विधवा नाही, एक महिला आहे. नवरा कमकुवत होता तो गेला; पण मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे. अडचणीच्यावेळी दिल्लीतच नव्हे तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा सिद्ध झाले, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी व्यवस्थेवर घणाघात केला.

साहित्य संमेलन आणि वाद यांचे जवळचे नाते आहे. ९२ वे मराठी साहित्य संमेलनही त्यापासून भिन्न ठरले नाही. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण अचानक मागे घेतल्यामुळे संमेलन सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले होते. त्यातच काही साहित्यिकांनी या संमेलनावर बहिष्कार टाकला. त्यामुळे हे संमेलन कसे होणार याकडे बहुतेक सर्वच मराठी भाषिकांचे लक्ष लागले होते. मात्र संमेलनाला साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला होता. मंडप भरून गेला होता. उद्घाटनप्रसंगी वैशाली येडे यांनी रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन केले. त्यानंतर केलेल्या भाषणात येडे म्हणाल्या की, माझा या जन्मावर विश्वास आहे, त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय.

- Advertisement -

पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे वाटून पतीने आत्महत्या केली. पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला आणि जगरहाटीने विधवापण लादले.

सहगल यांचे मुखवटे

- Advertisement -

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष मदन येरावर यांचे भाषण सुरू असताना तीन कवयित्री सहगल यांचे मुखवटे घालून संमेलनात दाखल झाल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र महिला पोलिसांनी त्या महिलांना मुखवटे काढून ठेवण्यास सांगितले. पण त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्याकडील मुखवटे जप्त करून त्यांना मंडपाबाहेर काढण्यात आले. सहगल यांचे मुखवटे घालून आपण निषेध नोंदवत असल्याचे त्या महिलांनी सांगितले. मात्र मंडपातून बाहेर काढल्यावर त्या कुठेही दिसल्या नाहीत.

सहगल यांच्या विचारांना सलाम

साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांच्या भाषणाचे वाचन केले. नयनतारा सहगल यांच्या साहित्य कर्तृत्वास आणि निर्भीड विचारास मी सलाम करतो. त्यांना निमंत्रण देऊन ते रद्द करण्याच्या महामंडळाच्या निर्णयावर मी नाराज आहे. साहित्यिकांची गळचेपी होत असताना साहित्य महामंडळ गप्प का, असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.

संभाजी ब्रिगेडचा गोंधळ

राज्य सरकारकडून सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे साहित्य संमेलनाला उपस्थित होते. ते भाषण करत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी फलक झळकावून सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्याबरोबर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. यावेळी विनोद तावडे यांनी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पाठीशी असून निमंत्रण रद्द केल्याच्या वादात सरकारला खेचू नका, असे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -