घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये तरूणाची भोसकून हत्या, परिसरात खळबळ

नाशिकमध्ये तरूणाची भोसकून हत्या, परिसरात खळबळ

Subscribe

पूर्व वैमानस्यातून या तरूणाची हत्या केल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

जुन्या नाशिकमधील गंजमाळ परिसरात असलेल्या भीमवाडी झोपडपट्टीजवळ एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी (काल) रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भीमवाडीमध्ये राहणाऱ्या अरबाज पठाण (१९) या तरूणावर काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अरबाजचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, अरबाज पठाण गंजमाळ भागातून जात असताना काही हल्लेखोर पाठलाग करुन त्याच्याजवळ पोहचले आणि धारधार शस्त्रांनी अरबाजवर वार करायला सुरुवात केली. त्यांनी अरबाजच्या पोटावर आणि छातीवर एकापाठोपाठ एक वार केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अरबाजला त्याच अवस्थेत टाकून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.  खुनाच्या या घटनेमुळे भीमवाडी परिसरात काही काळासाठी घबराटीचे वातावरण पसरले होते.


वाचा : ठाण्यात अपघात रोखण्यासाठी ‘रोबोट’ची मदत

परिसरातील नागरिकांनी अरबजला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर भीमवाडी परिसरात तसंच अरबाजला दाखल करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने लोक गोळा झाले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, पूर्व वैमानस्यातूनच त्याचा खून झाल्याची स्थानिकांमध्ये कुजबूज आहे. अरबाजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तसंच फरार मारेकऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे. अरबाजच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. उपलब्ध माहितीनुसार, आज (बुधवारी) अरबाज त्याच्या मित्रांसोबत अजमेर येथे जाणार होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -