मनसेचे लोकसभेसाठी झुकरबर्ग मॉडेल

मोदी, शहा हटावसाठी हटके फंडा

Mumbai

मोबाईल तुमचा, डेटा तुमचा, रिसर्च तुमचा, पण रणनीती लोकसभेची, अशी हटके स्ट्रॅटेजी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वापरण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि अमित शहा यांना हरवायचे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जी जी माहिती मिळेल ती जमा करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना नुकत्याच झालेल्या मेळाव्यात केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसली तरीही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक गृहपाठ दिला आहे. तो म्हणजे भाजपविरोधी गोष्टी शोधून काढायच्या. इंटरनेटवर जा आणि सगळ्या सविस्तर गोष्टी खोदून काढा, हेच उदिष्ट लोकसभेची स्ट्रॅटेजी म्हणून मनसैनिकांना देण्यात आले आहे.

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून रणनीती आखण्याचा वेगळा प्रयोग मनसे करणार आहे. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना इंटरनेटवरून माहिती गोळा करणे, पुरावे गोळा करणे अशा स्वरूपाच्या राजकीय शिक्षणाची सवय लावणे अतिशय गरजेचे आहे. लोकसभेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी ठरवताना माहितीचे संकलन करणे, असा क्राऊड सोर्सिंगचा प्रयोग महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या निमित्ताने होत असल्याचे मत मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी मांडले. फेसबुकवरून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकांसाठी डेटा मिळवण्याचे आवाहन आम्ही केले आह

त्याला गेल्या काही दिवसांपासून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी कर्जमाफीचे पैसे, भाजप सरकारच्या विविध योजना, गृहनिर्माण योजना यासारख्या अनेक मुद्यांवर कार्यकर्ते बोलते झाले आहेत. अनेक बाबतीत गेल्या सरकारचं अपयश आहे. ते लोकांसमोर मांडा. त्यासाठी स्वत: इंटरनेटवर जाऊन खात्री करून घ्या. अभ्यास करा. त्या गोष्टी फार व्यापक प्रमाणात समाजात पसरवा, असे आवाहन शिदोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

ज्यांनी मागच्या निवडणुकीला मोदींना मतदान केलं होते ते लोक कोण आहेत ते पहा. त्यांच्याशी बोला. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी माहितीचा वापर करा. मोदींना मतदान केले आहे अशा तीन लोकांना रोज प्रत्यक्ष भेटा. नुसता व्हॉट्सअ‍ॅप नको, फेसबुक संदेश नको. जे थोडे वेगळा विचार ऐकू शकतात, चर्चा करू शकतात. त्यांना तुमचा राजकीय विचार पटवून द्या, त्यांनी म्हटले आहे.

आपण आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. परंतु आपल्याला निवडणुकीत कुणाला हरवायचं आहे हे माहीत आहे. ते आपलं लक्ष्य आहे. भारतात हे कदाचित पहिल्यांदा झालं असावं की एखाद्या पक्षाचा कुणीच उमेदवार नाही, परंतु त्या पक्षाला स्वत:चं एक राजकीय ध्येय आहे. लक्षात ठेवा माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनो, ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे, असे शिदोरे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here