टिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’

प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष असून, या मंडळांनी सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला. ही मूर्ती साकारण्यासाठी १ महिना लागला.

ganpati

मुंबईतील गणेशोत्सव मंडळ आपला बाप्पा खास आणि आकर्षक दिसावा याकरता वेगवेगळ्या कल्पना वापरून निसर्गाला पूरक असा बाप्पा साकारतात. काही मंडळे बर्फापासून तर काही मंडळ कडधान्यांपासून बाप्पा साकारून निसर्गाची हानी रोखण्याचा प्रयत्न करतात. अशा विविध साहित्यांपासून बाप्पा साकारुन आपले वेगळेपण दाखवण्याचा मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचा प्रयत्न असतो. असेच वेगळेपण प्रभादेवी मधील एल्फिन्स्टन विभाग सार्वजनिक मंडळाने साकारले आहे. यंदाही पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती साकारली आहे. यावर्षी या मंडळाने चक्क टिशू पेपरपासून १४ फूट उंच अशी १५ किलो वजनाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती राजेश मयेकर या मूर्तीकारांनी साकारी आहे.

प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष असून, या मंडळांनी सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला. ही मूर्ती साकारण्यासाठी १ महिना लागला असून या मंडळांच्या इतर कार्यकर्त्यांनी देखील मदत केली आहे.

पूजेला लावण्यात आलेली मूर्ती देखील टिशू पेपरपासून साकारण्यात आली असून या छोट्या मूर्तीचे वजन १५० ग्रॅम आहे. तसेच ही छोटी मूर्ती विरघळण्यास अवघे १० मिनिटे लागणार असून मोठी मूर्ती विरघळण्यास ३० मिनिटे लागणार असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार शैलेश पाटील यांनी दिली आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस दीपक मुरुडकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी इकोफ्रेंडली बाप्पा साकारण्याचे ठरवले आहे.