नव्या वर्षात सण उत्सव ११ दिवस आधीच

कंकणाकृती सूर्यग्रहणही दिसणार

Mumbai
सूर्यग्रहण

येणारे नवीन वर्ष लीप वर्ष नसल्याने 2019 हे वर्ष 365 दिवसांचेच असणार आहे. या नूतन वर्षी सर्व सण उत्सव या वर्षींपेक्षा अकरा दिवस अगोदर येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते,खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. सुवर्ण खरेदी करणार्‍यांसाठी 2019 मध्ये 6 जून, 4 जुलै, 1 ऑगस्ट असे तीन गुरुपुष्ययोग आहेत. सन 2019 मध्ये विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिने वगळता इतर नऊ महिने विवाह मुहूर्त आहेत.

पुढच्यावर्षी तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होणार असून 16 जुलैचे खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. सोमवार , 11 नोव्हेंबर 2019 रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण आपल्या इथून दिसणार नाही. 15 जानेवारी 2010 रोजी म्हणजे आठ वर्षांपूर्वी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. पुढच्यावर्षी सन 2019 मध्ये गुरुवार, 26 डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून कंकणाकृती स्थितीत तर उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमींना पुढच्या वर्षी मिळणार आहे. खगोल अभ्यासकांच्या दृष्टीने ही एक पर्वणी असणार आहे. कोइम्बतूर, कन्नुर,करूर, मंगलोर, उटकमंड येथून सूर्यग्रहणातील कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. मुंबईतून 85 टक्के सूर्यबिंब ग्रासित दिसणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणेश भक्तांची हाक गणरायानं ऐकली असून पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे 11 दिवस आधी होणार आहे. पुढच्या वर्षी 2 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. यंदा हे आगमन 13 सप्टेंबरला झालं होतं. त्यामुळं पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे 11 दिवस लवकर होणार आहे.

यावर्षी दिवाळी सलग सहा दिवस संपन्न झाली. परंतु पुढील वर्षी सन 2019 मध्ये दिवाळीचा सण चारच दिवसांचा असणार आहे. गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी एकाच दिवशी शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी रविवारी 27 ऑक्टोबर रोजी आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आहे. त्यामुळे दिवाळीची सुट्टी एकच दिवस मिळणार आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीज असल्याचे सोमण यांनी सांगितले.