घरमुंबईनव्वदीपार आजीबाईंच्या पित्ताशयातून काढले १११० खडे

नव्वदीपार आजीबाईंच्या पित्ताशयातून काढले १११० खडे

Subscribe

अलिबागच्या ९४ वर्षीय आजीबाईंच्या पित्ताशयातून १ हजार ११० खडे काढण्यात आले आहेत. एका वेळेस एवढे खडे काढणं महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे.

अलिबागच्या ९४ वर्षीय आजीबाईंच्या पित्ताशयातून १ हजार ११० खडे काढण्यात आले आहेत. एका वेळेस एवढे खडे काढणं महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे. गेल्याच महिन्यात खारघरमधील महिलेच्या पित्ताशयातून ५५० खडे काढण्याची घटना ताजी असताना अलिबागमध्ये राहणाऱ्या ९४ वर्षीय महिलेच्या पित्ताशयात १ हजार ११० खडे मिळाल्याची दुर्मिळ घटना नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे घडली आहे. या केसमध्ये आजींवर लॅप्रोस्कॉपीक शल्यचिकित्सा करून त्यांचे पित्ताशय काढून टाकण्यात आले आहे.

थळ (अलिबाग) मध्ये राहणाऱ्या राधाबाई नाईक (वय ९४) यांना पोटदुखीचा त्रास तीन महिन्यांपासून सुरु होता. त्यांच्या वयाचा विचार करता स्थानिक डॉक्टर त्यांना हेवी डोस देऊ शकत नव्हते. वयाची ९० वर्षे पूर्ण झालेली असल्यामुळे पित्ताशय काढण्याची शल्यचिकित्सा कठीण असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे लॅप्रोस्कॉपीक शल्यचिकित्सक डॉ नितीन तवटे यांनी दिली.

- Advertisement -

तब्बल ३ तास शस्त्रक्रिया सुरू होती 

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. नितीन तवटे म्हणाले, “या महिलेच्या वयाचा विचार करता वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा केसमध्ये शल्यचिकित्सा करणे टाळले जाते. कारण, या वयामध्ये भूल देणारी औषधे/इंजेक्शन शरीराला पेलवत नाही आणि त्याचे दुष्परिणाम रुग्णावर होतात. तंतूविरहित पदार्थ, अति कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ बद्धकोष्ठता, दिवसभरात कमी वेळा जेवणे तसेच मॅग्नेशियम, कॅल्शिअम आणि क जीवनसत्त्व यांसारख्या पोषकतत्त्वांचा जेवणातील अभाव यामुळे पित्ताशयात खडे होतात. हे जरी सर्वसाधारण असले तरी या केसमध्ये या आजीबाईंचे पित्ताशय हे पूर्णपणे जंतुसंसर्गामुळे बाद झाले होते ते काढल्यावर यामध्ये १ हजार ११० खडे सापडले. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या केसेसचे प्रमाण जास्त आढळून येते आणि याकडे दुर्लक्ष केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. जवळपास ३ तास या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे ”

पित्ताशयात खडे असण्याची लक्षणे

पोटात उजवीकडे खालच्या बाजूने दुखते. मळमळ आणि उलटी झाल्यासारखे वाटते. तर अनेकदा पेशंटना पोट फुगणे, स्निग्ध पदार्थांचा त्रास, ढेकर येणे, गॅस तसेच अपचन ही लक्षणे पित्ताशयात खडे होण्याची असून सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी आणि एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार याविषयी अधिक माहिती मिळते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘अक्युट कॅल्क्युलस कोलेसिस्टिसीस’ असं म्हणतात.

- Advertisement -

१० पैकी ३ रुग्णांमध्ये आढळते ही समस्या

दहा पैकी तीन रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते. सर्वसाधारणपणे रुग्णांच्या पित्ताशयात १० ते २० खडे दिसून येतात. अत्यंत दुर्मिळ प्रकरणात ५०० खडे असल्याचं आढळून आलं आहे. पण, या केसमध्ये १ हजार ११० खडे आढळून आले आहेत. ही महाराष्ट्रातील दुर्मिळ वैद्यकीय घटना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -