घरमुंबई१२ वर्षीय मुलीच्या मणक्यात बसवले २४ स्क्रू

१२ वर्षीय मुलीच्या मणक्यात बसवले २४ स्क्रू

Subscribe

जीटी या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या मणक्यात तब्बल २४ स्क्रू बसवून तिचा मणका पूर्ववत केला. पण, या मुलीला जन्मभर या स्क्रूची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

मानवी शरीरातील एखादं हाड जरी वाकलं किंवा मोडलं तरी शरीर वाकल्यासारखं होतं आणि तो त्रास सहन न करण्यासारखा असतो. जळगावच्या एका १२ वर्षीय मुलीला असाच पाठीच्या मणक्याला एक विचित्र आजार जडला होता. या मुलीचा मणका १० डिग्रीपेक्षा जास्त पुढच्या आणि बाजूच्या दिशेने वाकला होता. पण, जीटी या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या मणक्यात तब्बल २४ स्क्रू बसवून तिचा मणका पूर्ववत केला. पण, या मुलीला जन्मभर या स्क्रूची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

उपचारासाठी गाठली मुंबई

जळगावातील पाचोरा तालुक्यातील प्रियांका मेंढरे (बदललेलं नाव) ही मुलगी गेल्या १२ वर्षांपासून ‘टायपोस्कोलोयसिस’ या आजाराने त्रस्त होती. ज्यात मणका पुढे, मागे किंवा बाजूच्या दिशेने वाकलेला असतो. प्रियांकाचाही मणका एका दिशेने वाकला होता. जसजशी प्रियांका मोठी होत गेली तसतसा तिच्या पाठीचा आकार विचित्र झाला. तिच्या आईला या आजाराचं आश्चर्य वाटत होतं आणि काळजीही वाटत होती. त्यामुळे तिच्या आईने जळगावातील स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. शिवाय, औरंगाबादमधील डॉक्टरांनाही दाखवलं. पण, तिकडे तेवढ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध नसल्याने आईने प्रियांकाला मुंबईत आणलं.

- Advertisement -

जीटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

प्रियांकाला आधी जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तिला जीटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं. त्यानुसार, प्रियांका ९ मे या दिवशी जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. काही तपासण्या केल्यानंतर २१ मे या दिवशी प्रियांकावर मणक्याची शस्त्रक्रिया केली गेली. जीटी हॉस्पिटलमध्ये प्रियांकावर झालेल्या ४ तासांच्या शस्त्रक्रियेमुळे तिला जीवदान मिळालं आहे.

मणक्यामध्ये असतात ४ बाक

मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने, पाठीला मागच्या दिशेने, कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाक असतो. हे चार बाक मिळून मणक्यांचा पूर्ण स्तंभ तयार होतो. हे बाक जोपर्यंत टिकून असतात तोपर्यंत मणक्यांच्या स्तंभाची लवचिकता टिकून राहते.

- Advertisement -

काय आहेत कारणं ?

१० वर्षानंतर जेव्हा मुलांची वाढ होत असते तेव्हा मणक्यामध्ये एका दिशेला दबाव पडतो. त्या जास्त दबावामुळे एका दिशेचा मणका वाढत नाही. तर, दुसऱ्या दिशेला कमी दबावामुळे मणका चुकीच्या दिशेने वाढत जातो, असा एक समज आहे. अशा रुग्णांना दुसरा कोणताही आजार नसतो. ४५ डिग्रीपेक्षा जास्त मणका वाकलेला असेल त्यावेळेस शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. अशा रुग्णांमध्ये पाठीचं दुखणं, कार्डिओरेसेप्टरी समस्या, कॉस्मेटिक समस्या जाणवतात. त्यातही मुली किंवा महिलांमध्ये हा आजार सर्वात जास्त जाणवतो. जे.जे हॉस्पिटल समुहाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या निरीक्षणाखाली ही मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जीटी हॉस्पिटलचे अस्थिव्यंगशास्त्र डॉ. धीरज सोनावणे यांनी सांगितलं की, ” अशा केसेस वाढत चालल्या आहेत. पण, बरेचसे स्पाईन सर्जन अशा सर्जरी करत नाही. कारण, तशी यंत्रसामग्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसते. शिवाय, महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे. या मुलीच्या मणक्यात २४ स्क्रू बसवले आहेत. पाठीच्या चौथ्या मणक्यापासून ते कंबरेच्या मणक्यापर्यंत हे स्क्रू बसवले आहेत. तिला हालचाल करता यावी यासाठी २८ जागांवर सांधे सैल केले आहेत. यासाठी नस आणि स्क्रू योग्य ठिकाणी आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांना खूप वेळ लागतो.”

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -