घरमुंबईतब्बल 59 लाखांच्या 15 ट्रॉल्या जप्त

तब्बल 59 लाखांच्या 15 ट्रॉल्या जप्त

Subscribe

तळोजा पोलिसांची कामगिरी

तळोजा पोलिसांनी 2 चोरट्यांसह 59 लाखांच्या 15 ट्रॉल्या हस्तगत केल्या आहेत. यातील 11 ट्रॉल्यांचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करून 4 ट्रॉल्यांच्या मालकाचा शोध सुरू आहे. या तपासामुळे ट्रॉली चोरीचे अनेक गुन्हे उघड होणार आहेत.

12 नोव्हेंबर 2019 रोजी तळोजा पोलीस ठाण्यात ट्रेलर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ट्रॉली तळोजा, उरण, न्हावा शेवा, कामोठे भागातून चोरीस गेल्या होत्या. गुन्हा दाखल होताच तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी काशीनाथ चव्हाण, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर निकम, पोलीस उपनिरीक्षक सतीश घुगे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

- Advertisement -

पोलिसांनी कळंबोली ते धानसर चेकनाका येथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून एक रिकामी ट्रॉली जात असल्याचे त्यांना सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्या गाडीचा नंबर घेतला असता पोलिसांकडून चालक व मालक यांना ताब्यात घेण्यात आले. मालकाकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला नकार दिला. त्या दोघांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी ट्रेलरच्या ट्रॉल्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या ट्रॉल्या वडाळा यार्ड परिसरात ठेवल्या असल्याचे सांगितले. अमीर शेख (42, वडाळा) आणि दशरथ ढमाळ (53, शिवडी) अशी या आरोपींची नावे आहेत.

रस्त्याच्या कडेला थांबवलेल्या ज्या ट्रॉलींचे टायर सुस्थितीत आहेत, अशाच ट्रॉली हे चोरटे चोरत होते. त्यांच्याकडून 59 लाखांच्या 15 ट्रॉल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी 11 गुन्हे दाखल असून 4 ट्रॉल्यांचे गुन्हे दाखल झालेले नसल्याने त्यांच्या मालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी काशीनाथ चव्हाण यांनी दिली. चोरटे महिना 10 ते 15 हजार रुपये भाड्याने या चोरीच्या ट्रॉली देत होते. यातील काही ट्रॉली भाड्याने देण्यात आल्या होत्या. तर काही ट्रॉली वडाळा येथून हस्तगत करण्यात आल्या. या दोन चोरांना अटक झाल्यामुळे 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -