पूर्व उपनगरातील १५ पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू

Mumbai
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर महापालिकाकडून सर्वेक्षण

अंधेरीतील रेल्वे पुलाच्या दुर्घटनेनंतर पूर्व उपनगरातील १५ उड्डाणपूल, पादचारी पूल यांची किरकाळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहेत. या पुलांच्या दुरुस्तीबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करणार्‍या महापालिकेने अंधेरीतील पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुलांची कामे हाती घेण्यात येत असून लवकरच या पुलांच्या कामाला सुरुवात होईल. अंधेरीतील रेल्वे पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबईतील सर्वच उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. पूर्व उपनगरांतील पुलांच्या सर्वेक्षणासाठी स्ट्रक्टवेल डिझाईनर्स अ‍ॅण्ड कन्सल्टंट यांची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानुसार पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, कांजूर, पवई, विक्रोळी, कुर्ला, गोवंडी आदी भागांमधील १५ विद्यमान पुलांची तसेच भुयारी मार्गांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

पूर्व उपनगरातील महापालिकेच्या ‘एस’, ‘एन’ व ‘टी’ या विभागातील ११ पुलांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी २४.९८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या ११ पुलांच्या दुरुस्तीसाठी प्राईम डेव्हलपर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर महापालिकेच्या ‘एल’, ‘एम’ पूर्व व ‘एम’ पश्चिम विभागातील ४ पुलांच्या दुरुस्तीसाठी ७.६१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. सल्लागारांच्या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याचे महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केले.

या पुलांची होणार दुरुस्ती
भांडुप पश्चिम येथील केदार चौक पादचारी पूल
मुलुंड पश्चिम येथील एम.जी.एल.आर ट्रंक मुख्य पूल
मुलुंड कॉलनीतील पादचारी पूल
मुलुंड पूर्व पश्चिम रेल्वेवरील पूल
मुलुंड अग्निशमन दलाजवळील स्वामी समर्थ पूल
भांडुप पश्चिम टेंभीपाडा येथील पादचारी पूल
पवई रामबाग येथील भुयारी मार्ग
घाटकोपर प्रताप गांधी चौक येथील एम.जी. रोड/हवेली रेल्वेवरील पूल
घाटकोपर अंधेरी लिंक रोड एव्हरेस्ट गार्ड जवळील रेल्वेवरील पूल
विक्रोळी टागोर नगर कांजूरमार्ग जवळील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक येथील रेल्वे पूल
मुलुंड मिलिंद नगर पुलावर ध्वनीरोधक बसवणे
कुर्ला पूर्व येथील ए.टी.आय कंपाऊंड येथील नाल्यावरील पूल
कुर्ला विभागातील ९० फूट रोडवरील डिझोझानगर पूल
गोवंडी पूर्व-पश्चिम येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल
घाटकोपर विद्याविहार पूर्व येथील सोमय्या महाविद्यालय
एम.जी. रोड गरोडियानगर पूल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here