घरमुंबईमहापालिकेचे 1500 बालरक्षक सज्ज

महापालिकेचे 1500 बालरक्षक सज्ज

Subscribe

डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षण देणार

शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारतर्फे शोध मोहीम राबवण्यात येते. ही शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या शाळेतील 1500 शिक्षकांना मुंबई महापालिकेने विशेष प्रशिक्षण दिले आहे. यातील 60 शिक्षकांना डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

झोपडपट्टीतील मुले, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कारखान्यांमध्ये काम करणारी मुले अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळा सुटलेली मुले आहेत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावे यासाठी सरकारतर्फे शोध मोहीम राबवण्यात येत आहे. शाळाबाह्य मुलांना शोधण्याच्या मोहिमेची जबाबदारी सरकारने शिक्षकांवर सोपवली आहे. परंतु झोपडपट्टी, कारखाने, रस्त्यावर शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यास तयार होत नसतात, मुले कमावती असल्याने ते शाळेत गेल्यास घरखर्च कसा चालणार या विवंचनेत पालक शाळेत पाठवण्यास नकार देतात.

- Advertisement -

काही ठिकाणी झोपडपट्टी दादांकडून शिक्षकांना दमदाटी होते. त्यामुळे शिक्षकांना शाळाबाह्य मुलांना शाळेत आणताना येणार्‍या समस्यांचा दूर करता याव्यात व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने अशाप्रकारे 1500 शिक्षकांना ऑक्टोबरमध्ये संगमनेर येथे झालेल्या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे आता बालरक्षक असलेले शिक्षक अधिक जोमाने आपले काम करून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणू शकतील असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर व उपशिक्षणाधिकारी प्रकाश चर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बालरक्षक काम करणार आहेत.

प्रशिक्षण देण्यात आलेल्या 1500 बालरक्षकांमधून 60 बालरक्षकांची निवड राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यांना डिसेंबरमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईच्या 12 शहर साधन केंद्रातून प्रत्येकी पाच अशापद्धतीने या 60 बालरक्षकांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. या बालरक्षकांना डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक अशोक लोखंडे यांनी दिली.

- Advertisement -

बालरक्षक आधार समितीची स्थापना
शाळाबाह्य मुलांना शाळेत आणताना शिक्षकांना पालकांची समजूत काढताना, त्यांच्या सामाजिक, आर्थिक समस्या, प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षकांना येणार्‍या या अडचणी लक्षात घेऊन बालरक्षक आधार समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक पोलीस, महिला व बाल कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, महापालिका शिक्षण विभाग, शिक्षण निरीक्षक विभाग, समग्र शिक्षा अभियान प्रादेशिक विद्या प्राधिकरण, बाल कामगार विभाग आदींच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अशी माहिती समता विभागाचे जिल्हा प्रमुख सुनील आहिर यांनी दिली.

15 डिसेंबरला विशेष मोहीम
शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी 15 डिसेंबरला महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये सापडणार्‍या शाळाबाह्य मुलांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करून या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. ही मोहीम अंगणवाडी सेविकांसोबत राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक अशोक लोखंडे यांनी दिली.

शाळाबाह्य मुलाच्या शोध मोहीमेंतर्गत यावर्षी मुंबईतून आतापर्यंत एक हजार 286 शाळाबाह्य मुलांना शोधून शाळेत दाखल करण्यात आले.

सापडलेली शाळाबाह्य मुले
महिना          सापडलेली शाळाबाह्य मुले
एप्रिल                 1052
मे                        23
जून                        –

   जुलै                      152
ऑगस्ट                    41
सप्टेंबर                    18
…………………………………………….
   एकूण                  1286

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -