स्कूलबसच्या अपघातात 16 चिमुकले जखमी

Mumbai
स्कूलबस अपघात

पालघरमधील जे.पी.इंटरनेशनल शाळेच्या बसला झालेल्या अपघातात 3 ते 5 वयोगटातील 16 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ढवळे हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जे.पी.शाळेतील ज्युनियर आणि सिनीअरचे 16 विद्यार्थी घेऊन स्कूलबस दुपारी 1 च्या दरम्यान निघाली होती. केळवा-पाणेरी रस्त्यावर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्ता सोडून खाली उतरली आणि एका झाडाला धडकली.

त्यावेळी प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी बसमधील विद्यार्थ्यांना बसमधून काढून पालघरच्या शासकिय रुग्णालयात नेले. तिथे किरकोळ जखमी असलेल्या 4 विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. मात्र,12 चिमुकले गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळच्या फिलीया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टर नसल्याने दोन तास वाया
या हॉस्पीटलमध्ये एकही डॉक्टर हजर नव्हते. ते येईपर्यंत वेळ मारून नेण्यासाठी या हॉस्पीटलमधील नर्सेसनी सर्व विद्यार्थ्यांना ग्लुकोजच्या बाटल्या लावून ठेवल्या. कोणतेही उपचार न करता फक्त सलाईनवर वेळ काढत असल्याचा प्रकार स्थानिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी हॉस्पीटलच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. त्यावेळी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 12 विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना मुका मार लागला होता.

त्यांचे चेहरेही सुजले होते. तर हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यातच दोन तास फिलीया हॉस्पीटलमध्ये वाया गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी मुलांना दुसर्‍या हॉस्पीटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाने डिस्चार्ज देण्यास नकार दिला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांनी ढवळे हॉस्पिटलमध्ये दुपारी 3 वाजता दाखल केले. तिथे या सर्वांवर उपचार करण्यात येत आहे. या अपघातात स्कूलबसचा चालकही जखमी झाला आहे. अतीवेगामुळे त्याचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.