बाईकस्वाराला वाचविण्याच्या नादात बेस्टचाच झाला अपघात; १६ प्रवाशी जखमी

bus meets with accident
बेस्ट बसला अपघात (फोटो - दीपक साळवी)

बेस्टच्या मिनी बसला विक्रोळी येथे अपघात होऊन १६ प्रवाशी जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. आज सकाळी १०.४५ च्या सुमारास बसमार्ग क्र. २७ ची भाडेतत्त्वावर चालणारी बस भांडूप सोनापूर येथून वरळी आगाराकडे जात होती. त्यावेळी विक्रोळी येथील गोदरेज कंपनी जवळील पुलावरून भरधाव येणाऱ्या एका मोटारसायकल स्वाराला वाचविण्यासाठी बसचालकाने प्रसंगावधान राखून उजवीकडे वळण घेतले. त्यामुळे सदर बस दुभाजकावर आदळली. बसमधील १६ प्रवाश्यांना किरकोळ स्वरुपात इजा झाली असून ७ प्रवासी राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे उपचार घेत असून ८ प्रवासी आंबेडकर रुग्णालय, विक्रोळी येथे तर १ प्रवासी सायन रुग्णालय, येथे उपचार घेत आहे.

mini best bus accident
जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताच्या वेळी बसमध्ये २० ते २२ प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. अपघातानंतर इतर प्रवाशी आणि रस्त्यावरील लोकांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्याचे काम केले. घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनीही अपघातस्थळी धाव घेतली. या बसला आता क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला काढण्यात आले आहे.