लालबागच्या राजाला १७ लाखांचे बिल

'लालबागच्या राजा'च्या मंडळाला देण्यात येणाऱ्या सेवांसाठी शुल्क तब्बल सहा पटीने वाढविण्यात आले आहे. अग्निश्मन दलाने यंदा १७ लाखाचे आगाऊ बिल मंडळाला पाठवले आहे.

Mumbai
17 lakh for fire safety for lalbaugcha raja in mumbai
लालबागचा राजा

सेलिब्रिटी आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मंडळाला देण्यात येणाऱ्या सेवांसाठी शुल्क तब्बल सहा पटीने वाढविण्यात आले आहे. अग्निश्मन दलाने यंदा १७ लाखाचे आगाऊ बिल मंडळाला पाठवले आहे. दोन वर्षांपूर्वी अडीच ते तीन लाख रुपये असलेले हे शुल्क आता १७ लाखांवर गेले आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त याठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे या गर्दीत एखादी दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशामक दलाची गाडी चोवीस तास अकरा दिवस मंडळाच्या परिसरात उभी असते. त्यावर जवानही तैनात असतात. या सुविधेसाठी अग्निशामक दलाने लालबागचा राजा मंडळाकडे १७ लाखांची मागणी केली आहे. एवढे मोठे बिल आल्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी तीन लाखांचे बिल

गेल्या वर्षी देखील अग्निशामक दलामार्फत मोठे बिल पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर स्थापत्य समितीमध्ये नगरसेवक सचिन पडवळ आणि श्रद्धा जाधव यांनी विरोध केल्यानंतर हे बिल कमी करत ती रक्कम तीन लाखांवर करण्यात आली होती. सन २०१६ मध्ये याच सुविधेसाठी अडीच लाखांचे बिल देण्यात आले होते. मग दोन वर्षांत एवढ्या मोठ्या रकमेचे बिल कसे काय असा सवाल स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे.

असे आकारण्यात आले बिल

२ ते १२ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी एक अग्निशमन बंब कर्मचाऱ्यांसह सज्ज ठेवण्याकरिता १७ लाखांचे बिल आकारण्यात आले आहे. पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार ठरवून देण्यात आलेल्या शुल्कानुसार ही रक्कम आकारण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. पहिल्या तीन तासांकरिता १० हजार ६४० रुपये तर त्या पुढील प्रत्येक तासासाठी ३ हजार ६०० रुपये लावण्यात आले आहेत. एकूण २६४ तासांकरीता ९ लाख ५० हजार २४० रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. त्यात जीएसटी आणि कर्मचाऱ्यांचा भत्ता मिळून १७ लाख २० हजार ९२३ रुपये आकारण्यात आले आहे.


हेही वाचा – लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा; आदित्य ठाकरेंची उपस्थिती