घरमुंबई१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी पॅरोलच्या शेवटच्या दिवशी झाला फरार

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी पॅरोलच्या शेवटच्या दिवशी झाला फरार

Subscribe

मुलाकडून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई शहरात 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील टाडाचा मुख्य आरोपी आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला मोहम्मद जलीस शफीउल्ला अन्सारी (68) हा गुरुवारी पहाटे नमाजाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला आणि अचानक बेपत्ता झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या मुलाने मोहम्मद जलीस हे मिसिंग झाल्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.

मार्च 1993 साली मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मोहम्मद जलीस याचा सहभाग उघडकीस येताच त्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी टाडाखाली अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याला विशेष टाडा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा होताच त्याला राजस्थान येथील अजमेर कैद्रीय कारागृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो तिथेच शिक्षा भोगत आहे. 28 डिसेंबर 2019 रोजी त्याच्यावतीने सुप्रीम कोर्टात अर्ज करण्यात आला होता. त्यात त्याने 21 दिवसांच्या संचित रजेची मागणी केली होती. या अर्जावर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने त्याला 21 दिवसांची संचित रजा मंजूर करताना स्थानिक पोलीस ठाण्यात सकाळी साडेदहा ते बारा या कालावधीत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

ही रजा मंजूर होताच जलीस अजमेर कारागृहातून त्याच्या आग्रीपाडा येथील मोमीनपुरा, बीआयटी चाळ क्रमांक एक, खोली क्रमांक 36 मध्ये आला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तो नियमित आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी जात होता. बुधवारपर्यत तो हजेरीसाठी गेला होता. यावेळी त्याला आग्रीपाडा पोलिसांनी शुक्रवारी 17 जानेवारीला आर्थर रोड कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी सकाळी पाच वाजता मोहम्मद जलीस हा नमाजासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र बराच वेळ होऊनही परत आला नाही. त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर त्याच्या मुलाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे त्याचे वडिल मोहम्मद जलीस शफीउल्ला अन्सारी हे मिसिंग झाल्याची तक्रार केली आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या मिसिंगची तक्रार नोंदवून घेतली आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आग्रीपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या सर्वच युनिटच्या अधिकार्‍यांना मोहम्मद जलीस याचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर पोलिसांनी त्याच्या घरापासून काही अंतरापर्यंत काही सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याच्या मोबाईलवरुन त्याचे लोकेशन काढण्याचे काम सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -