एसटी कर्मचाऱ्यंसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीपूर्वी २ महिन्यांचं वेतन मिळणार!

anil parab

गेल्या सात महिन्यांपासून अविरतपणे सेवा पुरवणारे एसटी कर्मचारी पगार न मिळल्यामुळे रडकुंडीला आले आहेत. दिवाळी सण तोंडावर आला असताना एसटी कर्मचार्‍यांचा हातात एकही दमडी पडलेली नाही. त्यामुळे या आर्थिक घुसमटीला कंटाळून रत्नागिरी आणि जळगावच्या एसटी कंडक्टरांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. दोन जीव गमावल्यानंतर एसटी महामंडळाला आता जाग आली आहे. सोमवारी दुपारी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी थकीत वेतन देण्याची घोषणा केली. तसेच एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचार्‍यांनी उचलू नये, असे भावनिक आवाहन अनिल परब यांनी केले आहे.

गेले ३ महिने एसटीच्या सुमारे ९७ हजार अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर सोमवारपासून जमा होईल. ज्या कर्मचार्‍यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम (बिनव्याजी उचल) हवी असेल त्यांना तातडीने अग्रीम देण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित 2 महिन्याच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे या काळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणार्‍या सुमारे 3 हजार कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले. परंतु याकाळातील इतर खर्च, जसे कर्मचार्‍यांचे वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरु झाली आहे. परंतु कोरोना महामारीच्या भीतीमुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे टाळले आहे. याचा विपरीत परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे टाळेबंदीपूर्वी सुमारे दररोज 65 लाख प्रवासी वाहून नेणार्‍या एसटीकडे सध्या केवळ 13 लाख प्रवाशांचा चढ-उतार होत आहे. यातून दररोज 7 कोटी रुपयांचा महसूल मिळत असून टाळेबंदीपूर्वी दररोज 22 कोटी रुपये महसूल मिळत असे. प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटी पूर्वपदावर येईल, असा विश्वासही परिवहन मंत्री यांनी व्यक्त केला आहे.

शासनाने मदत करण्याची विनंती

तिकीट विक्रीतून मिळणार्‍या महसुलात व्यतिरिक्त इतर मार्गाने एसटीचा महसूल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मालवाहतूक, सर्वसामान्यांच्या साठी पेट्रोल-डिझेल पंप, टायर पुन: स्थिरीकरण प्रकल्प व्यावसायिक तत्वावर राबवणे, खाजगी वाहतूकदारांना बस बॉडी बिल्डिंग करून देणे, असे अनेक पर्याय महसूल वाढवण्यासाठी एसटीने निर्माण केले आहेत. परंतु त्यासाठीदेखील निधीची आवश्यकता असून एसटीची आर्थिक स्थिती भक्कम होईपर्यंत, शासनाने मदत करावी, अशी विनंती आपण शासनाला केली असल्याचे मंत्री अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

सकाळीपासून राज्यभर आक्रोश आंदोलन

एसटी कर्मचार्‍यांना ऑगस्ट 2020 पासून तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सोमवारी राज्यभर एसटी कर्मचारी आपल्या राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश आंदोलन करत राज्य शासनाचे लक्ष केंद्रित केले. सकाळीपासून राज्यभर एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाविरोधात घोषणाबाजी केली. आपल्या संताप व्यक्त केला. याच दरम्यान सकाळी जळगावच्या एसटी कंडक्टर मनोज चौधरी यांनी आर्थिक घुसमटीला कंटाळून आत्महत्या केली.