परळच्या नव्या टर्मिनससाठी 2 हजार झाडांवर पडणार कुर्‍हाड

Mumbai

आरेतील मेट्रोच्या कारशेडसाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा मुद्दा ताजा असताना, आता पुन्हा रेल्वेच्या परळ टर्मिनससाठी 2 हजार झाडांवर कुर्‍हाड पडणार आहे. भारतीय रेल्वेची जननी समजल्या जाणार्‍या 140 वर्षे जुन्या असलेला परळ रेल्वेचा वर्कशॉप बंद करण्यात येणार आहे. या वर्कशॉपच्या तोड कामासाठी 2 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.मात्र या तोडकामात 2 हजार झाडे देखील तोडण्यात येतील.

देशातील रेल्वे आर्थिक संकटात असल्याचे कारण सांगणार्‍या रेल्वे बोर्डाने परळचा वर्कशॉप बंद करून तो हलवण्याचा घाट घातला आहे. या जागेवर टर्मिनस उभारण्याचे निमित्त बोर्डाकडून पुढे करण्यात येत आहे.परळ वर्कशॉपच्या कर्मचार्‍यांची बदली करण्यास सुरूवात झाली आहे. हा वर्कशॉप तोडण्यासाठी रेल्वेला दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इतकेच नव्हे, तर या वर्कशॉपच्या परिसरात तब्बल 2 हजार लहान मोठी झाडे आहेत. या झाडांमुळे मुंबईला मोठ्या प्रमाणात शुध्द हवा मिळत आहे. मात्र रेल्वेने हा वर्कशॉपच बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या दोन हजार झाडे तोडण्यात येतील,त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे,अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री प्रवीण वाजपेयी यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे.

वाजपेयी यांनी सांगितले की, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने संपूर्ण परळच्या वर्कशॉपच्या झाडांची मोजणी केली आहे.त्या प्रत्येक झाडाला बिल्ला सुध्दा लावण्यात आला आहे.आतापर्यंत दोन हजार झाडे मोजण्यात आली आहेत.मात्र, कारखाना बंद करून या जागेवर टर्मिनस उभारण्यात येणार असल्यामुळे ही झाडे तोडण्यात येणार आहेत. यासंबंधी आम्ही मध्य रेल्वेशी संपर्क केला असता, माहिती घेऊन सांगण्यात येईल,अशी प्रतिक्रिया देण्यात आली.ज्याप्रमाणे आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आरे कारशेडमुळे होणार्‍या वृक्षतोडीला स्थगिती दिली होती,त्याचप्रमाणे या वृक्षतोडविरोधात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे,सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी सांगितले.

जेव्हा परळ वर्कशॉप बंद करण्याचा जेव्हा निर्णय झाला. तेव्हा आम्ही परळ कारखान्यात असलेल्या झाडांची मोजणी केली. या वर्कशॉपच्या परिसरात 2 हजार झाडे आहेत. त्यामुळे ही झाडे मुंबईच्या पर्यावरणासाठी खूप महत्वाची आहेत. कारशेड तर आम्ही बंद होऊ देणार नाही. जर असे झाले तर आम्ही पर्यावरण प्रेमींना आंदोलन करु. – प्रवीण वाजपेयी, महामंत्री, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

परळच्या या रेल्वे वर्कशॉपमध्ये रेल्वे कोचचे संपूर्ण काम होत असल्याने हा वर्कशॉप ११ महत्त्वाच्या विभागांमध्ये चालतो. यात डिझेल इंजिनचे ओव्हरऑयलिंग, क्रेन ओव्हरऑयलिंग, व्हिल शॉप, फिटिंग शॉप, टूल शॉप, कोच रिपेअर शॉप, मशिन शॉप, वेल्डिंग शॉप, स्मिथी शॉप, ट्रॅक्शन मशिन्स रिपेअर शॉप आणि सी अ‍ॅण्ड एम लॅब या विभागांचा समावेश आहे. या कारखान्यात १४० टन वजनाची अजस्त्र अशी क्रेनही बसवण्यात आली. रेल्वेसंबंधीत कामे करण्यासाठी इतरत्र जावे लागू नये,म्हणून या कारखान्यात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे.त्यामुळे हा वर्कशॉप बंद झाल्यास रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here