मालाडमध्ये भिंत पडून २२ जणांचा मृत्यू

९३ जण जखमी, मृतांमध्ये सात बालकांचा समावेश

Mumbai
MALAD

मालाड पूर्व येथील पिंपरीपाड्यातील रहिवाशांसाठी येथील संरक्षक भिंत मंगळवारी काळरात्र ठरली. मालाड जलाशयाची महापालिकेने नव्याने बांधलेली संरक्षक भिंत मध्यरात्री एकच्या सुमारास झोपड्यांवर कोसळून २2 जणांचे जीव गेले. मृतांमध्ये ७ बालिकांचा समावेश आहे. तर ९३ जखमी झाले आहेत. या सर्वांवर कांदिवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, जोगेश्वरी ट्रामा केअर सेंटर, मालाड एम.व्ही.देसाई रुग्णालय, कुपर आणि केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंत तोडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळपर्यंत हे काम सुरु होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख तसेच महापालिकेने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

मालाड पिंपरीपाडा, शिवनेरी हायस्कूलजवळ, राणी सती मार्ग येथील मालाड जलाशय परिसराची संरक्षक भिंत सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास येथील १० ते १२ झोपड्यांवर कोसळली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबे झोपेत होती. त्यामुळे भिंतीच्या ढिगार्‍याखाली अडकून ११४ जण जखमी झाले होते. त्यानंतर त्वरीत मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, पोलीस, रुग्णवाहिका यांच्यासह महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यातील जखमींना तात्काळ कांदिवली शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना जोगेश्वरी ट्रामा केअर रुगणालयात दाखल करण्यात आले. तिथून मग मालाड देसाई रुग्णालय, कुपर आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी २१ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर ७८ जणांवर पाचही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.तर १५ जणांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. मृतांमध्ये सात बालकांचा समावेश आहे.