घरमुंबईयंदा मुंबईत २०० हून अधिक कृत्रिम तलाव, प्रत्येक वॉर्डात एका तलावचे नियोजन!

यंदा मुंबईत २०० हून अधिक कृत्रिम तलाव, प्रत्येक वॉर्डात एका तलावचे नियोजन!

Subscribe

गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करावे आणि शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन शासन आणि मुंबई महापालिकेने केल्यानंतर यासाठी जोरदार तयारी केली. यासाठी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात एक या प्रमाणे सव्वा दोनशे कृत्रिम तलाव उभारण्याचे नियोजन मुंबई महापालिकेच्या केले जात आहे. त्यामुळे मागील १३ वर्षात जिथे महापालिकेला कृत्रिम तलावांची संख्या ५० पर्यंत नेता आली नाही, ती संख्या कोरोनामुळे का होईना २०० च्या वर पोहोचणार आहे.

मुंबईत कोरोनामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांनी केले आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी न जाता शाडूची किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महापालिकेने सध्या असलेल्या ३४ कृत्रिम तलावांच्या तुलनेत सुमारे २०० कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीचे नियोजन महापालिका वॉर्ड स्तरावर केले जात असून खुद्द सहायक आयुक्त हे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात एक या प्रमाणे नियोजन करताना दिसत आहेत. त्यामुळे ही संख्या २०० च्या वर जाण्याची शक्यता आहे. विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या महापालिकेच्या के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी आपल्या प्रभागात समितीच्या हद्दीत १३ नगरसेवक असल्याने १३ कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी केली आहे.

यंदा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर कमी गर्दी करायची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ३४ च्या तुलनेत २०० पर्यंत कृत्रिम तलाव उभारले जातील. दरवर्षी कृत्रिम तलावांत ३० हजार पर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २ लाखांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त कृत्रिम तलावांची संख्या वाढवली जाणार आहे.

नरेंद्र बरडे, सह आयुक्त आणि महापलिका समन्वयक (उत्सव)

- Advertisement -

घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेण्यास मनाई राहील. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्क तथा शिल्ड अशी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत, असे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -