घरमुंबईमहापौर बंगला हस्तांतरणासाठी २३ जानेवारीचा मुहूर्त

महापौर बंगला हस्तांतरणासाठी २३ जानेवारीचा मुहूर्त

Subscribe

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी दोन ते तीन परवानग्या शिल्लक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ट्रस्टकडे हस्तांतरीत होणार होता. मात्र अजूनही दोन ते तीन परवानग्या शिल्लक असल्यामुळे लाखो शिवसैनिकांना आणखी काही महिने स्मारकासाठी वाट पाहावी लागणार आहे.

येत्या काही महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजे २३ जानेवारी २०१९ रोजी महापौर बंगल्याचे हस्तांतरण पूर्ण करावे, अशी रास्त अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी केली.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुखांच्या सहाव्या स्मृती-दिनानिमित्त राज्यभरातून हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, महिला शिवसैनिक आणि नेते मंडळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्मृती स्थळावर आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, ट्रस्टच्या सदस्य खासदार पुनम महाजन यांच्यासह अनेकांनी शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृती स्थळावर येण्याअगोदर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यावर गेले. त्यावेळी तेथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची दहा मिनिटे भेट घेत चहापान केले. यावेळी महापौर बंगल्यावर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते.

- Advertisement -

चहापान करताना सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष स्मारकाकरिता महापौर बंगला हस्तांतर करण्यासाठी दोन ते तीन परवानग्या शिल्लक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या परवानग्या पूर्ण होतील आणि बाळासाहेबांचे भव्य स्मारक आपण उभारू, असे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीतून स्मृती स्थळापर्यंत आले. त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे सुद्धा होते.

आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होणार की नाही यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. त्यात शनिवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर हजेरी लावल्याने मुख्यमंत्र्यांची युतीसाठी शिवाजी पार्क डिप्लोमसी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या भेटीत स्मारकाविषयी चर्चा झाल्याचे शेवटी दिसून आले.

सध्या भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये विस्तवही जात नाही असे वातावरण असले तरी त्याचा या दोन्ही पक्षांमधल्या ‘कौटुंबिक’ संबंधांवर अजिबात फरक पडलेला नाही, असेच चित्र दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -