घरमुंबईफटका टोळीच्या आक्रमणानंतर तरुणीने जवळजवळ गमावला होता पाय

फटका टोळीच्या आक्रमणानंतर तरुणीने जवळजवळ गमावला होता पाय

Subscribe

आता परत ट्रेनमधून प्रवास करायचा आलाय धीर

– आरोपीलाही केले माफ

- Advertisement -

 

कल्याणमधील २३ वर्षीय द्रविता सिंह अजूनही आपल्यावर झालेल्या हल्ल्यातून सावरलेली नाही. वाणिज्य शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या द्रविता सिंहचे आयुष्य एका क्षणात बदलून गेले. अजूनही तिच्या हातापायावर उपचार चालू आहेत. ७ फेब्रुवारी रोजी ट्रेनमधून प्रवास करत असताना तिच्यावर फटका टोळीने आक्रमण केले होते. ज्यामध्ये तिने तिचा पाय गमावल्यातच जमा होता. मात्र या प्रसंगाला ती धीरानं सामोरं गेली. आता पुन्हा एकदा ट्रेनच्या प्रवासाला सामोरे जायचं तिने ठरवलंय. मागच्याच शनिवारी आपली आई इश्रावतीबरोबर तिने सकाळी ८.०१ ची कल्याणवरून ट्रेन पकडून परत प्रवास केला.

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्यातील ती सकाळ तिच्यासाठी लागोपाठ वाईट गोष्टीच घेऊन आली. द्रविता फोर्टमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करत होती. तिने नेहमीची ट्रेन पकडली होती. सकाळी ९.१५ वाजता पकडलेल्या ट्रेनमुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. रेल्वेच्या दरवाजावर उभं असणाऱ्या लोकांच्या हातावर फटके मारून त्यांच्या हातातील गोष्टी हिसकावून घेण्यासाठी फटका टोळी कुप्रसिद्ध आहे. याच टोळीतील एका १७ वर्षीय मुलाने मारलेल्या फटक्याने द्रविताला हिसका बसला. सॅंडहर्स्टला तिची ट्रेन आली असता ती सहज ट्रेनच्या दरवाजाशी उभी राहिली आणि तिच्या हातावर बांबूचा फटका बसला.

याबद्दल बोलताना आताही तिला त्रास होतोय. ती फटका बसल्यानंतर चालत्या ट्रेनमधून खाली पडली होती. त्यातून ती वाचली हाच तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी सर्वात मोठा चमत्कार आहे. ती पडल्यानंतर तिच्या डोक्याला आणि हाताला जबर मार बसला होता. त्याही परिस्थितीत ती ट्रॅकमधून सीएसटीच्या दिशेने चालत गेली. तिच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तिला काहीही धड कळत नव्हतं. तिची अवस्था अतिशय वाईट असताना मोटरमन मुन्नालाल सिंह आणि रेल्वे गार्ड राजीव निषाद यांनी तिला जेजे हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर भाटिया रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तिच्यावर आतापर्यंत सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण महत्त्वाचा प्रश्न पैशाचादेखील होता. याकाळात तिला खूप वेळा डिप्रेशनला सामोरं जावं लागलं. या सगळ्यात तिला शारीरिक आणि मानसिक प्रचंड त्रास सहन करावा लागला. तरीही द्रविताने त्या १७ वर्षीय आरोपीला माफ केले. कारण त्याला अटक झाल्यानंतर त्याने आपला नेम चुकल्याचे सांगितले. भीतीमुळे कदाचित यातून परत उभं राहायला वेळ लागेल, हे तिला माहीत आहे. पण तरीही परत त्याच जिद्दीने ती उभी राहायला सज्ज झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -