घरमुंबईघरफोडी आणि चैन स्नॅचिंगचे 24 गुन्हे उघडकीस

घरफोडी आणि चैन स्नॅचिंगचे 24 गुन्हे उघडकीस

Subscribe

कल्याण डोंबिवली शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणार्‍या सहा अट्टल आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पप्पू सुंदर यादव, आकाश रमेश गोरे, दत्ता पाटील आणि दत्ता माटेकर , तर चैन स्नॅचर कासीम अफसर इराणी आणि फिरोज सरवर अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून घरफोडीचे 14, तर चेन स्नॅचिंगचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

कल्याण डोंबिवली शहरात चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. मागील महिन्यात कल्याण पश्चिमेतील ठाणगेवाडी परिसरात असणार्‍या मेडिकलच्या दुकानात घरफोडी झाली होती. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 मोबाईल आणि 500 रुपये चोरले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना महात्मा फुले पोलिसांच्या हाती पप्पू सुंदर यादव, आकाश रमेश गोरे, दत्ता पाटील आणि दत्ता माटेकर ही चौकडी हाती लागली.

- Advertisement -

पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी किराणा दुकान, मेडीकल स्टोअर्स, स्वीट मार्ट, कापड आदी दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली . या चौघांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात 3, हिललाईनमध्ये 5, विठ्ठलवाडी 2, कोळसेवाडी 2, मानपाडा आणि नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात 2 असे 14 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.ए.नांद्रे, हवालदार शिंदे, पोलीस नाईक निकाळे, चौधरी, भालेराव, चित्ते, भणगे, दळवी आणि पोलीस शिपाई पवार या पथकाने केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 मोटारसायकलसह 2 लाख 41 हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

गुन्ह्यात इराणी कुटूंब
परिमंडळ 3 च्या अँटी रॉबरी स्कॉडकडून दुसर्‍या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच त्यांनी 2 इराणी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चैन स्नॅचिंगचे 7 आणि वाहन चोरीचे 3 असे 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही दिवसांपूर्वी अँटी रॉबरी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीतून कासीम अफसर इराणी याला अटक केली. त्याच्या तपासात कासीमने चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली देत या वस्तू विकणार्‍या फिरोज सरवर इराणीचीही माहिती दिली. त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाणे 2, महात्मा फुले 1, कोळसेवाडी 2, टिळकनगर , डोंबिवली , मुंब्रा , विठ्ठलवाडी आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच हा आरोपी ठाणे पोलिसांच्या टॉप 20 चैन स्नॅचरच्या यादीतील वॉन्टेड गुन्हेगार असल्याचेही पोलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.

- Advertisement -

या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील 72 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3 महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत. मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यामध्ये तो सध्या जामिनावर सुटला असून त्याची आई, 2 भाऊ, बहिणीही या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कारवाई अँटी रॉबरी स्कॉडचे उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दिपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, भालेराव, शिपाई रविंद्र हासे, चिंतामण कातकडे, सुनील गावित आदींच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -