मालाडच्या भिंत प्रकरणात मृतांचा आकडा २७

मालाडच्या आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा या परिसरात झालेल्या भिंत दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai
MALAD-PIMPARIPADA-PATHANWADI-7
मालाडच्या भिंत प्रकरणात मृतांचा आकडा २७

मालाडच्या आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा या परिसरात सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढत आहे. घडलेल्या घटनेच्या दिवसापासून ते आतापर्यंत २७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर, ७० जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत एकूण १२१ जण जखमी झाले होते. त्यातील २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

रात्रीच्या सुमारास अचानक भिंत झोपड्यांवर कोसळल्याने या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना नेमकं काय करावं? कुठे पळावं? हे सूचतंच नव्हतं. त्यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत लहान मुलांचाही हकनाक मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू केलं गेलं. एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवासी लोकांचं शोधकार्य करत होते. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती होती. बुधवारी जवानांकडून शोधकार्य थांबवलं गेलं. पण, स्थानिक लोक आपलं कोणी जमिनीखाली अडकलं आहे यासाठी स्वत: च शोधकार्य करत होते. त्यामुळे स्थानिकांमध्येही नाराजी होती.

या घटनेत अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. तर, आंबेडकर नगर परिसरातील अनेक झोपड्यांचं नुकसान झालं. स्थानिक जमिनीखाली आपला संसार शोधत होते. ही परिस्थिती आजही कायम आहे. कारण, या परिसरातील दोनशेहून अधिक झोपड्या पाण्याखाली वाहून गेल्या आहेत. पुन्हा संसार कसा उभारावा आणि कुठून सुरुवात करायची असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे. त्यामुळे, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करतात. सद्यपरिस्थितीत जखमींवर मुंबईतील शताब्दी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, केईएम, व्ही.एस.देसाई या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.


हेही वाचा – मालाडमध्ये भिंत पडून २२ जणांचा मृत्यू

हेही वाचा – भिंत भेदण्याची तिची धडपड निष्फळ!


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here