घरमुंबईमुंबईकरांच्या डोक्यावर २७४ पुलांची टांगती तलवार

मुंबईकरांच्या डोक्यावर २७४ पुलांची टांगती तलवार

Subscribe

मुंबईमधील २७४ पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात झाली, मात्र गेल्या दोन वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. पुलांचे ऑडिट करण्याच्या कामात अक्षम्य दिरंगाई झाली आहे. त्यामुळे अंधेरीतील पूल कोसळला.

अंधेरीतील पूल कोसळून जीवितहानी झाली नसली तरी मुंबईकरांच्या डोक्यावर पुलांची टांगती तलवार कायम आहे. मुंबईतला कुठलाही पूल कधीही कोसळू शकतो, अशी भयानक स्थिती आहे. कारण मुंबईतील २७४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलेच नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पुलाखालून जाताना तो पूल कोसळणार नाही ना, याची काळजी आता स्वत:च घ्यायला हवी. दोन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने आपल्या अखत्यारीतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे घोषित केले होते. तसेच मुंबई महापालिकेनेही मुंबईमधील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे मुंबईमधील २७४ पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात झाली, मात्र गेल्या दोन वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. पुलांचे ऑडिट करण्याच्या कामात अक्षम्य दिरंगाई झाली आहे. त्यामुळे अंधेरीतील पूल कोसळला, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी दिली.

स्ट्रक्चरल ऑडिट झालेच नाही

मुंबईमधील पुलांचे ऑडिट वेळी ऑडिट पूर्ण केले असते तर किती पूल जुने आहेत, आतापर्यंत त्यांची कितीवेळा डागडुजी झाली, त्या पुलाचे आयुष्य आदी बाबी समोर आल्या असत्या. तसेच ब्रिटिशकालीन पूल किती याचीही पालिकेला माहिती झाली असती. पालिकेने ऑडिट मार्चमध्ये पूर्ण होईल असे सांगितले होते. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला ऑडिट पूर्ण होईल असे सांगण्यात आले. मात्र हे ऑडिट अद्याप पूर्ण झालेले नसल्याने धोकादायक पुलांवरून नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून चालावे लागते. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे प्रशासनाने चर्चगेट ते विरार दरम्यान कोणताही पूल धोकादायक नसल्याचे दोन महिन्यांपूर्वीच सांगितले होते. मग आज ही दुर्घटना कशी घडली असा प्रश्न यादव यांनी उपस्थित केला आहे. रेल्वे पूल बांधण्यासाठी पालिकेला निधी देते यामुळे पुलांची जबाबदारी रेल्वे आणि पालिका दोघांची आहे. कोणीही आपली जबाबदारी झटकू नये, असे यादव यांनी सांगितले.

- Advertisement -

आठवडाभरात ऑडिट

रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे ऑडिट करण्याचे काम महापालिका करत नाही. मात्र २७४ पुलांचे ऑडिट येत्या आठवडाभरात पूर्ण करून तसा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता शितलाप्रसाद कोरी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

रेल्वे हद्दीतील ४४५ पुलांचेही सर्व्हेक्षण

मुंबईच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारला जाग आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या रेल्वे हद्दीतील ४४५ रोड ओव्हर, फूट ओव्हर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याची घोषणा केली आहे. रेल्वेच्या कमिशन ऑफ सेफ्टी यांच्याकडे अंधेरीच्या घटनेच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचा अहवाल १५ दिवसांत सादर केला जाणार आहे. तसेच, मुंबई आयआयटीचे प्राध्यापक देवांग कक्कड यांच्यावर मुंबईतल्या रेल्वे ब्रिजचे सेफ्टी ऑडिट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या ६ महिन्यात ऑडिट पूर्ण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -