रस्त्यांच्या ३६६ कोटींच्या १५ कामांना मंजुरी

शिवसेनेने, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या मदतीने हे सर्व रस्ते कामांचे प्रस्ताव पुढे रेटून नेले.

Mumbai
bmc will change water supply pipeline on link road
मेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

बहुचर्चित रस्ते कामांच्या प्रस्तावांना अखेर स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. पटलावर ठेवण्यात आलेल्या ५ प्रस्तावांसह जादा विषयांसह सादर केलेल्या १० अशा एकूण १५ रस्ते कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र, रस्त्यांच्या पाच प्रस्तावांना विरोध न करणार्‍या भाजपने जादा विषय असलेल्या १० प्रस्तावांना विरोध केला. परंतु, यापूर्वी बैठकीच्या आदल्यादिवशी आलेल्या प्रस्तावांना शिवसेनेच्या मदतीने मंजुरी देणार्‍या भाजपने मात्र, याठिकाणी विरोध दर्शवला. परंतु शिवसेनेने, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या मदतीने हे सर्व रस्ते कामांचे प्रस्ताव पुढे रेटून नेले.

पटलावर ठेवण्यात आलेले पाचही प्रस्ताव संमत

वादग्रस्त ठरलेल्या रस्ते कंत्राट कामांच्या पात्र कंत्राटदारांनी दहा टक्यांपर्यंत दर आणून काम करण्याची तयारी दर्शवली. अशा एकूण १५ रस्ते कामांचे प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवून उर्वरीत कामांच्या फेरनिविदा मागवल्या आहेत. त्यामुळे या १५ रस्ते कामांपैंकी पाच प्रस्ताव नियमित विषय पत्रिकेवर तर दहा प्रस्ताव जादा विषय म्हणून सोमवारी सदस्यांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे प्रस्ताव मंजुरीला आले असता, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी यातील अटींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्ते कामांची पाहणी करण्यासाठी त्रयस्थ पक्षकाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. परंतु, यापूर्वी नेमलेल्या त्रयस्थ पक्षकाराचा अनुभव पाहता आपल्या दक्षता पथकामार्फत याची तपासणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्याची दखल घेण्याची सूचना करत अध्यक्षांनी पटलावर ठेवण्यात आलेले पाचही प्रस्ताव संमत केले.

३६२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले

मात्र, त्यानंतर जादा विषय असलेल्या विषय क्रमांक ४९ अध्यक्षांनी पुकारताच, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी हे प्रस्ताव रात्री उशिरा आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे या प्रस्तावांचे वाचन व्हायचे असल्याने ते राखून ठेवण्याची सूचना केली. परंतु भाजप वगळता विरोधी पक्षांना हे प्रस्ताव मंजूर करायचे होते. त्यामुळे अध्यक्षांनी भाजप सदस्यांना विनंती करत रस्ते कामे तातडीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु प्रभाकर शिंदे हे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सपाच्या मदतीने अध्यक्षांनी हे प्रस्ताव मंजुरीला टाकले. त्यामुळे याचा निषेध म्हणून भाजपने सभात्याग केला. परंतु, तोपर्यंत अध्यक्षांनी, मुंबईतील रस्ते कामे तात्काळ व्हावी, म्हणून या प्रस्तावांना मंजुरी दिली. शहर वगळता पूर्व व पश्चिम उपनगरांतील या सर्व कामांसाठी एकूण ३६२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे

कामाचे स्वरुप : एम/पश्चिम विभागातील विविध रस्त्यांचे युटीडब्ल्यूटी पद्धतीत सुधारणा
एकूण कंत्राट किंमत : ३७ कोटी ८१ लाख रुपये
कंत्राटदार : फोर्स कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : एस विभागातील विविध रस्त्यांचे पक्क्या फरसबंदीमध्ये सुधारणा
एकूण कंत्राट किंमत : ३४ कोटी ६४ लाख रुपये
कंत्राटदार : रिध्दी एंटरप्रायझेस

कामाचे स्वरुप : पी/उत्तर मालाड पश्चिम विभागातील विविध लहान रस्त्यांचे सी.सी. पॅसेजचे काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : ३२ कोटी ५३ लाख रुपये
कंत्राटदार : भव्या एंटरप्रायझेस

कामाचे स्वरुप : आर/मध्य विभागातील सहा मीटर पेक्षा लहान रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : ३ कोटी ७८ लाख रुपये
कंत्राटदार : मावल कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : के/पूर्व विभागातील विविध चौकांची सुधारणा
एकूण कंत्राट किंमत : १२ कोटी २० लाख रुपये
कंत्राटदार : कैलाश कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : पी/उत्तर नवीन तहसिलदार आवारातील व लहान रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : २८ कोटी ९३ लाख रुपये
कंत्राटदार : मेसर्स गजानन कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : के/पश्चिम विभागातील विविध ६मीटर रुंदीपेक्षा रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट व पॅसेजचे काँक्रीटीकरण
एकूण कंत्राट किंमत : २८कोटी १६ लाख रुपये
कंत्राटदार : मेसर्स स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : के/पश्चिम विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट व पॅसेजचे काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : १६ कोटी २९ लाख रुपये
कंत्राटदार : ए.एस.के कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : एल विभागातील विविध रस्त्यांचे पक्क्या फरसबंदीमध्ये सुधारणा
एकूण कंत्राट किंमत : ४० कोटी ७० लाख रुपये
कंत्राटदार : मेसर्स डी.बी. इन्फ्राटेक