वसईच्या महसूल विभागातील 39 पदे रिक्त

Vasai
Vasai

वसईच्या महसूल विभागात नायब तहसीलदारांसह एकूण 39 पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांच्या कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. काही हजार लोकांसाठी कार्यरत असलेल्या वसईच्या महसूल म्हणजेच तहसील विभागात नायब तहसीलदार-2, अव्वल कारकून-1, मंडळ अधिकारी-2, लिपिक-7, तलाठी-1, शिपाई-4 आणि कोतवाल 22 अशा 39 जागा रिक्त आहेत. सुमारे 20 लाख लोकसंख्या असलेल्या वसई तालुक्यासाठी हे एकमेव कार्यालय आहे. नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार शहरातील नागरिक नवीन रेशनकार्ड बनविणे. नावे कमी वा वाढवणे, पत्ता बदलणे, उत्पन्नाचा दाखला, अधिवास, रहिवासी आणि जातीचा दाखला अशी विविध कामे करण्यासाठी येथील हजारो नागरिक तहसीलदार कार्यालयात जात असतात, तसेच जमिनीचे दावे, निवडणुकीची कामेही या कार्यालयात केली जातात.
मात्र, या कामांसाठी कार्यालयातील कर्मचारी कमी पडताहेत. त्यामुळे एका कामासाठी अनेकदा फेर्‍या मारण्याची पाळी नागरिकांवर येत आहे. परिणामी त्यांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी त्यांना दलालाचा मार्ग पत्करावा लागत आहे. जाब विचारल्यास स्टाफ कमी असल्यामुळे कामे वेळेवर होत नसल्याचे या कार्यालयातून सांंगण्यात येते. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

आता तर निवडणुका जवळ आल्यामुळे दोन दिवसांत होणारी कामे निवडणुकीमुळे लांबणार आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि महापालिका अशा सलग जानेवारी 2020 पर्यंत या निवडणुका चालणार असल्यामुळे येत्या वर्षभरात कामे लांबणीवर पडणार असल्यामुळे वसईकर धास्तावले आहेत. स्टाफ कमी असल्यामुळे कामे रेंगाळत असल्याचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी मान्य केले आहे, तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे पदांची भरती लांबल्याचे त्यांनी स्पष्ट केले.