घरमुंबईअंधेरी आरटीओत ४ कोटींचा घोटाळा

अंधेरी आरटीओत ४ कोटींचा घोटाळा

Subscribe

अंधेरी आरटीओत टॅक्सी व रिक्षांचे डीडी न भरता प्रवासी वाहनांना परस्पर परवाना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येक प्रवासी वाहनाच्या पासिंगकरिता आरटीओ कार्यालयात १५ हजार रुपये भरणे आवश्यक असून त्यानंतर गाड्यांना परवाना दिला जातो. मात्र, आरटीओ अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमताने ३ हजार गाड्यांना प्रत्येकी १५ हजारांचे डीडी (ड्राफ्ट) न घेता परवाने दिले गेले आहेत.

विशेष म्हणजे आता ही रक्कम वसूल करण्यासाठी आरटीओने ३ हजार गाड्यांच्या मालकांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना वाहनांची खरेदी केल्यानंतर वाहन पासिंगसाठी आरटीओत प्रत्येकी १५ हजारांचे शुल्क अदा करावे लागते. त्यानंतर वाहन परवाना मिळतो. ही प्रक्रिया थोडी किचकट असल्यामुळे आरटीओत वाहन चालक आपल्या कामासाठी सरळ दलालांची मदत घेतात. याचा फायदा घेऊन दलाल अधिकार्‍यांच्या मदतीने नियम धाब्यावर बसून वाहन परवाना मिळवून देतात. १५ हजारांचा डीडी भरल्यानंतर परवाना देऊन वाहन पासिंग केले जाते, मात्र आरटीओने डीडीचे पैसे न घेताच अनेक वाहनांना पासिंग आणि परवाने दिले आहेत.मात्र आता टॅक्सी आणि रिक्षा मालकांना पैसे भरण्यासाठी अंधेरी आरटीओ कार्यालयातून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे हे ३ हजार मालक अडचणीत आले असून आपण पैसे आधीच भरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

प्रशासकीय चुका आणि लालफित शाईमुळे हा गोंधळ उडाला आहे. राज्य सरकारने अवलंबलेल्या मुक्त परवाना धोरण अतंर्गत वाहनधारकांना परवाने दिले जातात. त्यामुळे केवळ कर्मचारीच नव्हे तर अधिकारीही या गैरप्रकाराला जबाबदार असल्याचे अंधेरी आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला सांगितले.  आतापर्यंत ९० टक्के वाहनधारकांना कायदेशीर परवाने देण्यात आले आहेत. मात्र १० टक्के वाहन मालकांनी डीडीचे पैसे आरटीओ कार्यालयात जमा न केल्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणे सुरु आहे. जर त्यांनी वेळेत डीडी भरला नाही तर त्याची वाहन नोंदणी रद्द करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहतूक अधिकारी अभय देशपांडे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे.  आरटीओत दररोज मोठ्या प्रमाणात खासगी आणि प्रवासी वाहने लायसन्स आणि इतर परवान्यांसाठी येतात. याचा फायदा घेत आरटीओतील दलाल परवाना काढून देण्याच्या नावाखाली टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून हजारो रुपये उकळतात. आरटीओ कार्यालयात दलाल आणि अधिकार्‍यांचे साटेलोटे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारचा महसूल बुडतो.

डीडीवर कुणाचे नाव नसते. फक्त आरटीओचे नाव असते. या डीडीवर एक कोड नंबर असतो. त्यामुळे एका डीडीवर १० गाड्यासुद्धा पास केल्या जातात, असा आरोप स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा संघटनेकडून करण्यात येत आहे. आरटीओच्या चुकीच्या धोरणामुळे आरटीओत दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे दलालांच्या मदतीने सरकारला फसवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.  अंधेरी आरटीओकडून टॅक्सी आणि रिक्षा चालकांना नोटीस पाठवून त्रास देण्याऐवजी, अंधेरी आरटीओतील जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. – के. के. तिवारी, अध्यक्ष,स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा संघटना.

- Advertisement -

स्वाभिमानी संघटनेच्या आरोपात काही तथ्य नाही. ज्या नागरिकांनी वाहन रजिस्ट्रेशन केल्यानंतर परमिटचे पैसे भरले नाहीत, त्यांच्यावर कायद्यानुसार आणि नियमांनुसार नोटीस पाठवून कारवाई करण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अंधेरी आरटीओ कार्यालयाच्या सही शिक्क्यानंतरच परमिटचे भरलेले पैसे अधिकृत मानले जातील. – अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी आरटीओ.

ज्यांनी परवान्याचे पैसे भरले त्यांना आम्ही परवाना दिला आहे. मात्र काही वाहनधारकांनी परवान्यांचे पैसे भरले नाहीत. आम्ही त्यांना परवाना दिलेला नाही. कायद्यानुसार आम्ही त्यांना नोटीस पाठवत आहोत. – शेखर चन्ने, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य

 

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -