ठाण्यात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, १२ लाखांच्या नोटा जप्त!

मुंबईतील मरोळ गाव अंधेरी येथे छापण्यात येणाऱ्या बनावट नोटांचा कारखाना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने उद्ध्वस्त करून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौकडीकडून पोलिसांनी ११ लाख ४९ हजार रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे जण सख्खे भाऊ बहीण असून दोघे जण मुंब्रा अमृत नगर येथे राहणारे आहेत. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने या चौघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुज्जमील मोहम्मद सुर्वे (४०), मुझ्झफर शौकत पावसकर (४१), प्रवीण देवजी परमार (४३) आणि नसरीन इम्तियाज काझी (४१) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून त्यापैकी मुज्जमील सुर्वे आणि नसरीन काझी हे दोघे मुंब्रा अमृत नगर आणि बॉम्बे कॉलनी येथे राहणारे असून इतर दोघे मुंबईतील साकीनाका आणि मरोळ गाव अंधेरी या ठिकाणी राहण्यास आहेत. नसरीन आणि मुझ्झफर हे दोघे सख्खे भाऊ बहीण असून नसरीन ही मुंब्रा तर पावास्कर हा मरोळ नाका, अंधेरी येथे राहण्यास आहे.

एक जण भारतीय बनावटीच्या बनावट चलन नोटा ठाण्यातील मुंब्रा येथील बाजारपेठेत चालवण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोनी. संजय शिंदे, सपोनि जगदीश मुलगीर, पोउनी रमेश कदम आणि पथकाने मुंब्रा येथून मुज्जमील सुर्वे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या भारतीय बनावटीच्या चलनी नोटा हस्तगत करण्यात करण्यात आल्या.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या नोटा मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी येथे राहणाऱ्या नसरीन इम्तियाज काझी हिच्या मार्फत अंधेरी मरोळ येथे राहणारा तिचा भाऊ मुझ्झफर शौकत पावसकर याच्याकडून अर्ध्या किंमतीत घेतल्या असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी नसरीनला ताब्यात घेऊन तिच्याकडे केलेल्या चौकशीत या नोटांची छपाई अंधेरी मरोळ येथे होत असल्याची माहिती दिली. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने मरोळ नाका येथे एका घरात छापा टाकला असता त्या ठिकाणी दोघे जण बनावट नोटाची छपाई करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी मुज्जमील मोहम्मद सुर्वे आणि प्रवीण परमार या दोघांना अटक केली. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे दोनशे, पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा अशा एकूण ११ लाख रुपये किंमतीच्या नोटा जप्त करून संगणक, प्रिंटर आणि नोटांसाठी लागणारा कागद जप्त करण्यात आला आहे.

मुंब्रा येथे अटक करण्यात आलेल्या मुज्जमील सुर्वे आणि नसरीन हे दोघे ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि मुंबई या ठिकाणी पन्नास टक्के कमिशनवर बनावट नोटा आणून त्या नोटा बाजारात वटवत होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर कामधंदा बंद झाल्यामुळे या चौकडीने जुलै महिन्यात बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली आणि लॉकडाऊनच्या काळापासून या नोटा बाजारपेठेत चालवत होती अशी माहिती कोथमिरे यांनी दिली. याप्रकरणी या चौघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी राज्यभर बनावट नोटांचे जाळे पेरले असून प्रत्येक ठिकाणी आपले एजंट नेमले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या अनुषंगाने तपास सुरु आहे.