आचारसंहिता कालावधीत राज्यात 4 हजार 428 गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे.

Mumbai
Elections

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात ४ हजार ४२८ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक ११ मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. परवाना नसलेली ३२८ शस्त्रे, ८१ काडतूसे आणि ८ हजार ३०२ जिलेटीनच्या कांड्या आदी  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून ३२ हजार ७९७ शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. १३१ प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत तर एकूण ४६ शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची ६३ हजार ६०८ प्रकरणे विचारात घेण्यात आली असून १६ हजार ३८० प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या ६ हजार २२८ प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. १९ हजार १५७ प्रकरणात अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आले असून २१ हजार २६४ प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.