परदेशातील नोकरीचे आमिष देत ४० जणांची फसवणूक

यूट्युब या समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून मलेशिया, रशियात नोकरी लावून देतो असे सांगून चार भामट्यांनी ४० जणांना गंडा घातला आहे.

Mumbai
यू ट्युब

यूट्युब या समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून मलेशिया, रशियात नोकरी लावून देतो असे सांगून चार भामट्यांनी ४० जणांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचने दोघांना अटक केली आहे. अनुज कुमार आणि गौरव कुमार, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई येथील मालाड भागात राहणारे विक्रम भाटी हे ऑक्टोबर २०१८ मध्ये युट्युबवर व्हिडीओ पाहत असताना त्यांना एका व्हिडीओवर एम. ग्रोथ ही कंपनी मलेशिया आणि रशियात नोकरी लावून देते असे दिसले. तसेच या व्हिडीओमध्ये कंपनीचा मोबाईल क्रमांक आणि पत्ताही देण्यात आला होता. त्यानुसार, विक्रम भाटी यांनी संबधित मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी त्यांच्याशी गौरव कुमार याने संवाद साधून त्यांना कापूरबावडी येथील कार्यालयात बोलावले. नोव्हेंबर २०१८ मध्ये विक्रम भाटी हे कापूरबावडी येथे आले. त्यानंतर, त्यांनी विक्रम यांना मलेशियात नोकरी लावून देतो असे सांगून विमानाचे तिकीट आणि व्हिसासाठी ५५ हजार रूपये घेतले.

१२ जानेवारीला विक्रम हे मलेशियात पोहचल्यानंतर तेथील पोलिसांनी विक्रम यांना विमानतळावर अडविले. तेव्हा त्यांचा व्हिसा बनावट असल्याची माहिती मलेशिया पोलिसांनी दिली. त्यानंतर दोन दिवस मलेशिया पोलिसांनी त्याला ताब्यात ठेऊन पुन्हा भारतात पाठविले. विक्रम पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी एम. ग्रोथ कार्यालय गाठले. घडलेल्या प्रकाराबाबत विक्रम यांनी अनुज आणि गौरवला विचारणा केली असता त्यावेळी या दोघांनी त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच रशियात नोकरीचे आमिष विक्रम यांना या दोघांनी दाखविले. रशियात नोकरी हवी असल्यास ३ लाख रूपये लागतील असे या दोघांनी सांगितल्यानंतर विक्रम यांनी पुन्हा या दोघांच्या खात्यात २ लाख ०५ हजार रूपये भरले. मात्र, तरीही त्यांना नोकरी देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाच करत होते.

दरम्यान, अनुज आणि गौरव या दोघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयदीप रणवरे यांच्या पथकाने सापळा रचून कंपनीच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. या दोघांनी ४० जणांची अशाचप्रकारे फसवणूक केली असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी दिली.