फार्मसी कॉलेजसाठी राज्यातून 40 प्रस्ताव

30 मे पर्यंत मंजुरीची कार्यवाही

Mumbai
pharmacy

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असल्याने पॉलिटेक्निक कॉलेज बंद करण्यासंदर्भात राज्यातील 27 शिक्षणसंस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे अर्ज केले आहेत. त्याचवेळी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढत असलेला कल पाहता यंदा तब्बल 40 नव्या कॉलेजांचे प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) दाखल झाले आहेत. या कॉलेजांना 30 मेपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कॉलेजांना मान्यात मिळाल्यास राज्यात अंदाजे पाच हजार फार्मसीच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वैद्यकीय क्षेत्राकडे काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. त्यामुळे तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक कॉलेज बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षणसंस्थांनी तंत्रशिक्षण संचलनालयाकडे पाठवले आहेत. तर दुसरीकडे फार्मसीच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी अधिक आणि जागा कमी असल्याने अनेकांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. सध्या डी. फार्मसीच्या राज्यात 19 हजार 589 जागा आहेत. त्यापैकी विनाअनुदानित कॉलेजांमध्ये 37 आणि सरकारी अनुदानित कॉलेजमधील 16 अशा 55 जागा गतवर्षी शिल्लक राहिल्या होत्या. विद्यार्थ्यांचा कल पाहता राज्यातील संस्थाचालकांनी या अभ्यासक्रमांना प्राधान्य देत तब्बल 40 नवे प्रस्ताव दाखल केले आहेत. या नव्या कॉलेजांच्या प्रस्तावावर एआयसीटीईच्या निकषांचे पूर्णपणे पालन केले जाते अथवा नाही याची चौकशी करून कॉलेजांना मान्यता देण्यात येणार आहे. कॉलेजांचे निकष तपासण्यासाठी एआयसीटीईकडून समिती नेमली आहे. ही समिती 30 मेपर्यंत पाहणी करून त्यांचा अहवाल सादर करेल. त्यानंतर नवीन कॉलेजांच्या मंजुरीचा निर्णय काढण्यात येणार आहे. त्यानुसार या महाविद्यालयांचा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार आहे.

कोणते निकष तपासणार
एआयसीटीईने नेमलेली समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे. नव्याने आलेल्या प्रस्तावावाबत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वसतिगृह, तसेच पुरेसे शिक्षक, एआयसीटीईच्या मानकानुसार जमीन, बांधकामाचे क्षेत्रफळ आदी माहिती या समितीकडून घेतली जाणार आहे.