वांद्रे येथे आर्थिक वादातून ४० वर्षांच्या महिलेची हत्या

अर्चना ऊर्फ श्वेता असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आनंद ऊर्फ दिनेश सुभाष सिंग (38) याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai
two group clashes in kolhapur
प्रातिनीधीक फोटो

मुंबई : वांद्रे येथे आर्थिक वादातून एका 40 वर्षांच्या महिलेची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. अर्चना ऊर्फ श्वेता असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आनंद ऊर्फ दिनेश सुभाष सिंग (38) याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. पैशांवरुन होणार्‍या भांडणातून आनंदनेच श्वेताची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून त्याला सोमवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी सांगितले. श्वेताची हत्या करुन आनंदने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला गेला आणि त्याला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली.

श्वेता ही नायगाव परिसरात राहते. वांद्रे ते बोरिवली परिसरात ती रात्रीच्या वेळेस वेश्याव्यवसाय करीत होती. काही महिन्यांपासूनच तिची आनंदसोबत ओळख झाली होती. तो वांद्रे येथील चॅपल रोड, रिलायबल कन्ट्रक्शन साईटवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. अनेकदा तो अर्चनाला भेटत होता, त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. मात्र तो तिला तिचे पैसे देत नव्हता. याच कारणावरुन या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता.

रविवारी रात्री अर्चना ही त्याच्या बांधकाम साईटवर आली होती, यावेळी या दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला होता. या वादानंतर तिने तिला बघून घेण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. हत्येनंतर तो चाकू आणि कपडे बदलून तेथून पळून गेला होता. सकाळी सव्वासहा वाजता अर्चना ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका कामगाराच्या लक्षात आले, ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. बांधकाम साईटच्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरु केली होती, या चौकशीत आनंदने तो मृत महिलेला ओळख नसल्याचा कांगावा करुन या हत्येचा त्याचा सहभाग नाही असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली.

मात्र त्याच्याकडे सतत केलेल्या चौकशीनंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, पैशांवरुन अर्चना ही त्याला ब्लॅकमेल करीत होती, त्यातूनच रागाच्या भरात त्याने तिची हत्या करुन तेथून पळ काढला होता. त्याच्या चौकशीनंतर त्याच्याकडून गुन्ह्यांतील हत्यार आणि रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले. हत्येच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दुपारी त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.