अनफिट टेस्टिंग ट्रॅकवर ४ हजार वाहनांची टेस्टिंग

ताडदेव आरटीओने सुरक्षा नियम बसविले धाब्यावर

Mumbai

राज्यातील आरटीओमध्ये वाहनांची फिटनेस टेस्ट होण्यासाठी कायद्यानुसार असलेल्या तरतुदींचे पालन स्वत: आरटीओकडून होताना दिसत नाही. नुकतेच ताडदेव आरटीओमध्ये टेस्टिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. अद्याप या टेस्टिंग ट्रॅकवर सुरक्षेची इतर कामे बाकी असून सुद्धा, असुरक्षित ट्रॅकवर वाहनांची टेस्टिंग घेण्याचा धडाका ताडदेव आरटीओने लावला आहे. आतापर्यंत नव्या अनफिट टेस्टिंग ट्रॅकवर ४ हजार वाहनांची टेस्टिंग घेऊन वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आरटीओच्या कार्यपध्दतीवर आज प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहेत.

मुंबईतील प्रादेशिक परिवहन मंडळांमध्ये (आरटीओ) वाहनांची ब्रेकतपासणी ही जागेअभावी कसोटीची परीक्षा आहे. आरटीओ कार्यालयात ब्रेकतपासणीसाठी 250 मीटर इतका ट्रॅक असावा, असा मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे. त्यादृष्टीने परिवहन विभागाकडून प्रयत्न सुरू असून मुंबईतील ताडदेव आरटीओमध्ये ‘टेस्ट ट्रॅक’ बांधण्याचे काम सुरू केले होते. पूर्वी ताडदेव आरटीओत 160 मीटरचा टेस्ट ट्रॅक होता. त्यात 90 मीटरची भर घालून हा टेस्ट ट्रॅक २५० मीटरपर्यंत वाढविण्यात आला. या कामाकरिता तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाले आहेत. वाहनांच्या ब्रेक चाचणीसाठी आरटीओमध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक आवश्यक आहे. या ताडदेव आरटीओच्या टेस्ट ट्रॅकच्या जागी झाडे असल्यामुळे या टेस्ट ट्रॅकचे काम काही काळ रखडून पडले होते. नंतर महापालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर या जागी असलेली झाडे हटवून काम मार्गी लावण्यात आले. हा टेस्टिंग ट्रॅक जून महिन्यात पूर्ण झाला.

मात्र या टेस्टिंग ट्रॅकवर बॅरिकेट्स, हॅलोजन, सीसीटीव्ही असे अनेक कामे बाकी आहेत. मात्र तरी सुद्धा ताडदेव आरटीओकडून १५ जून २०१९ पासून या अधुर्‍या आणि अनफिट टेस्टिंग ट्रॅकवर वाहनांची ब्रेक तपासणी सुरू केली आहे.आतापर्यंत या नव्या टेस्टिंग ट्रॅकवर एकूण 4 हजार 192 वाहनांचे ट्रेस्टिंग करण्यात आले आहेत. त्यामुळे ताडदेव आरटीओच्या कार्यपध्दतीवर वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हा टेस्टिंग ट्रॅक फक्त बनवून पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही या टेस्टिंग ट्रॅकची इतर कामे बाकी आहेत, मात्र वाहन धारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नवीन टेस्टिंग ट्रॅकवर वाहनांची फिटनेस चेक करत आहेत.

ताडदेव आरटीओमध्ये कोणत्या चाचण्या होतात?
ताडदेव आरटीओ कार्यक्षेत्र मध्य मुंबईत येते. त्यामुळे या आरटीओत वाहनांची संख्या जास्त असते. रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांसह अन्य व्यावसायिक आणि अवजड वाहनांची आरटीओत तपासणीला येतात. ज्यात ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेंशन, चाक, वेग, हेडलाईट इत्यादी तपासणी केली जाते. मात्र त्यासाठी स्वतंत्र टेस्टिंग ट्रॅक भावी जड वाहनांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी मुंबईबाहेरील आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. मात्र आता ताडदेव आरटीओत टेस्टिंग टॅ्रक उभारल्यामुळे टॅक्सी आणि कमी जड वाहनांची तपासणी सुरू केली आहे.