बहुचर्चित रस्ते कंत्राट कामांचे ५ प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत

Ashok Column Chowk closed tomorrow for smart road work

बहुचर्चित असलेल्या रस्ते कंत्राट कामांचे प्रस्ताव अखेर स्थायी समितीपुढे मंजुरीला प्रशासनाने ठेवले. रस्ते कंत्राट कामांमध्ये एकूण खर्चाच्या केवळ ६० टक्के रक्कम कंत्राटदाराला देऊन हमी कालावधींमध्ये उर्वरीत ४० टक्क्यांचे वाटप टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कंत्राटदारांनी अधिकची बोली लावून कामे मिळवली. त्यामुळे आयुक्तांनी या सर्वांसोबत वाटाघाटी केल्यानंतर पाच रस्ते कामांच्या कंत्राटाचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले. तब्बल १२० कोटींच्या कामांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवले असून उर्वरीत १० कामांचे प्रस्तावही सादर केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेने यावेळी प्रथम ६०:४० फॉम्युल्यानुसार रस्ते कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. तब्बल ३१ कामांसाठी मागवलेल्या या निविदांमध्ये कंत्राटदारांनी महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा २० ते ४० टक्के जास्त दराने बोली लावत काम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व स्तरातून याबाबत टीका तसेच आरोप होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी कंत्राटदारांशी वाटाघाटी करत कंत्राटदारांना दहा टक्के किंवा त्यापेक्षा दर कमी करण्यास भाग पाडले. त्यानुसार १६ कंत्राटदारांनी दर कमी करण्यास नकार दिला.

ज्या कंत्राटदारांनी दर कमी करण्याची तयारी दर्शवली त्यातील पहिल्या ५ कंत्राट कामांचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले. त्यामध्ये बोरीवली, गोरेगाव, कांदिवली, मालाड आदी भागांमधील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट तसेच पॅसेजेसचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ही सर्व कंत्राट कामे १२० कोटी रुपयांची आहेत. याशिवाय उर्वरीत पूर्व व पश्चिम उपनगरांतील रस्ते कामांचे प्रस्तावही मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीपुढे जादा विषय म्हणून सादर केले जाणार असल्याची माहिती रस्ते विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

या भागातील रस्त्यांचे होणार सिमेंट क्राँकीटीकरण

कामाचे स्वरुप : आर/मध्य विभागातील लिंक रोड येथे सी.सीवरील तुटलेले पॅनल, रस्त्यालगतचा पट्टया, पदपथांचे सिमेंट काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : ४० कोटी ३८ लाख रुपये
कंत्राटदार : एम.बी.ब्रदर्स

कामाचे स्वरुप : आर/मध्य विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट व पॅसेजचे काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : ५ कोटी ८० लाख रुपये
कंत्राटदार: मुकेश कंस्ट्रक्शन कंपनी

कामाचे स्वरुप : पी/उत्तर विभागातील लिंक रोड येथील रस्त्यालगतच्या पट्टयांचे सिमेंट काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : ४६ कोटी ८१ लाख रुपये
कंत्राटदार: एम.बी.ब्रदर्स

कामाचे स्वरुप : आर/दक्षिण विभागातील स्वयंभूगणेश मंदिर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : ४ कोटी ९८ लाख रुपये
कंत्राटदार: मानश कंस्ट्क्शन कंपनी

कामाचे स्वरुप : पी/दक्षिण विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट व पॅसेजचे काँक्रिटीकरण
एकूण कंत्राट किंमत : २० कोटी ०८ लाख रुपये
कंत्राटदार : विधी एंटरप्रायझेस