घरमुंबईक्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी महापालिका घरोघरी; ५० लाख लोकांची होणार तपासणी

क्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी महापालिका घरोघरी; ५० लाख लोकांची होणार तपासणी

Subscribe

मुंबईतील क्षयरोग व कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी येत्‍या १ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२० दरम्‍यान राबविण्‍यात येणाऱ्या एका संयुक्‍त मोहीमेदरम्‍यान महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. हे सर्वेक्षण सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या कालावधी दरम्‍यान केले जाणार आहे. तरी मुंबई नागरिकांनी महापालिकेच्‍या क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्‍या परिसरामधील साधारपणे १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ९ हजार २७७ व्‍यक्‍तींची क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहेत. या तपासणी अभियानासाठी महापालिकेची ३ हजार ४५१ पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांद्वारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्‍याने सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या दरम्‍यान भेटी देऊन क्षयरोग व कुष्‍ठरोग विषयक वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे. ही चाचणी संशयित रुग्‍णांच्‍या परिसर जवळ असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्‍या अगर सरकारी प्रयोग शाळेत मोफत केली जाणार आहे. तसेच क्ष-किरण चाचणी देखील निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत केली जाणार आहे. निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत तपासणी करता यावी यासाठी संशयित रुग्‍णाला विशेष ‘व्‍हाऊचर’ देण्‍यात येणार आहेत. ज्‍यामुळे संशयित रुग्‍णाला खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये जाऊन मोफत चाचणी करवून घेता येणार आहे. यानुसार अभियनादरम्‍यान चाचणी केल्‍यानंतर क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्‍या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत.

- Advertisement -

याच अभियनादरम्‍यान आढळून येणाऱ्या कुष्‍ठरोग संशयितांना नजिकच्‍या दवाखान्‍यात किंवा रुग्‍णालयात संदर्भित करण्‍यात येणार आहे. कुष्‍ठरोग संशयितांची तपासणी ही वैद्यकिय अधिका-यांमार्फत करण्‍यात येणार आहे. क्षयरोग विषयक लक्षणांबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्‍या कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. गोमारे यांनी सांगितले की, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवडयांपेक्षा अधिक काळ ताप असणे किंवा सायंकाळच्‍या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्‍त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधितानी तातडीने महानगरपालिकेच्‍या किंवा सरकारी रुग्‍णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्‍यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे.

कुष्‍ठरोग विषयक लक्षणांबाबत डॉ. गोमारे यांनी सांगितले की, त्‍वचेवर फिकट–लालसर चट्टा असणे, त्‍या ‍ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर, तेलकट चकाकणारी त्‍वचा, कानाच्‍या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्‍या येणे, बधीरपणा व जखमा असणे, त्‍वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, हात व पायांमध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे, हातातून वस्‍तू गळून पडणे, चालतांना पायातून चप्‍पल गळून पडणे इत्‍यादी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधितानी तातडीने महापालिकेच्‍या वा सरकारी रुग्‍णालयातून कुष्‍ठरोगाची तपासणी करवून घ्‍यावी.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -