केडीएमसीचा ५३५ कोटीचा आर्थिक घोटाळा?

शिवसेनेच्या नगरसेवकाने सत्यप्रतिज्ञापत्र सादर करत लोकायुक्तांकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.

kalyan
kdmc
केडीएमसी

महापालिकेने बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सची वसूली न करताच इमारतींना सीसी दिल्याचा प्रकार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उजेडात आणला आहे. बिल्डर, वास्तुविशारद, नगररचना विभागातील अधिकारी आणि कर निर्धारक व संकलक यांनी संगनमत करून महापालिकेचे सुमारे ५३५ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला असून, या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे नगरसेवक म्हात्रे यांनी सत्यप्रतिज्ञापत्रच सादर केल्याने खळबळ उडाली आहे.

पालिकेचे १५० कोटीचे उत्पन्न बुडाले

महापालिकेचे १९९० ते आजतागायत ओपन लॅण्ड टॅक्स ३९५ कोटी आहे. तसेच १९९५ ते आजतागायत डब्बल मालमत्तेचा कर ५५ कोटी रूपये आहे. या प्रकरणात पालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी व कर संकलक निर्धारक यांनी संगनमत करून इमारत पूर्णत्वाचा दाखल न घेताच, व पालिकेचा मालमत्ता करही वसूल न करता लोकांना राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच पाणी कनेक्शनही देण्यात आले आहे. कम्प्लीशन सर्टीफिकेट न घेतल्यामुळे महापालिकेचे अंदाजे १५० कोटी रूपये उत्पन्न बुडाले आहे. याला पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

हेही वाचा – वांद्रे-कुर्ला संकूल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री

बिल्डर व पालिका अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे

वास्तव्याचा दाखला, इमारत पूर्णत्वाचा दाखला न घेतल्याने स्टेअरकेस प्रिमीअमपासून मिळणारे १२५ कोटी रूपयांहून अधिक उत्पन्नाचे पालिकेचे नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासनाने अनेकवेळा तक्रार करून कोणतीच माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. बिल्डर व पालिकेतील अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने पालिकेची कोट्यवधी रूपयांची थकित रक्कम अजूनही वसूल होऊ शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे अशीही मागणी वामन म्हात्रे यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. माहितीच्या अधिकारात म्हात्रे यांनी ही माहिती उपलब्ध केली आहे. वामन म्हात्रे यांच्या तक्रारीने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here