घरमुंबईकरिष्मा, संयम आणि ऊर्जा

करिष्मा, संयम आणि ऊर्जा

Subscribe

८० च्या दशकातील छोटा भाऊ २५ वर्षांत मोठा भाऊ झालाय...आता त्याचीच ऊर्जा घेऊन शिवसेनेच्या तिसर्‍या पर्वाची सुरुवात झाली आहे. ते पर्व आहे आदित्य ठाकरेंचं. बाळासाहेबांच्या पिढीनं मनगटाच्या ताकदीवर सेनेचा डोलारा उभारला. उद्धव यांच्या कार्यकाळात संयमाच्या जोरावर गल्ली ते दिल्ली सत्तेचा तारू मार्गक्रमण करतोय. पण आता आदित्य यांना राजकारण करताना एका विलक्षण ऊर्जेची गरज लागणार आहे. ती ऊर्जा त्यांना आपले सहकारी, आपले समर्थक आणि राजकीय व्यवस्थेतून उभी करावी लागणार आहे.

“जमलेल्या माझ्या हिंदू बंधू , भगिणींनो आणि मातांनो…” अशी भाषणाची सुरुवात ‘त्यांनी’ आपल्या खांद्यावरची शाल सावरत केल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहत असत…या भाषणाच्या सुरूवातीनंतर पुढची ४०-५० मिनिटे श्रोता तो असो किंवा ती…ते ‘त्यांचे’ होत…ही प्रक्रिया १९ जून १९६६ रोजी सुरू झाली. ती आजतागायत तशीच सुरू आहे. पिढी बदलली…वक्ता बदलला… पण ५३ वर्षं एका सेनापतीचं आपल्या सैन्यावरचं गारुड कायम आहे. या सेनापतीचं नाव आहे…बाळ केशव ठाकरे… अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सैन्याचं नाव आहे… शिवसेना…भूमीपुत्रांच्या लढ्यासाठी सुरू झालेल्या या संघटनेच्या छोट्या रोपाचा आज वटवृक्ष झालाय. काळाच्या ओघात मराठी भूमीपुत्रांच्या संघटनेच्या वटवृक्षाच्या छायेत आता अनेक पांथस्थ येऊन विसावलेत. त्यांची संख्या आता इतकी वाढलीय की, आता खरा मराठी माणूस या वृक्षाच्या छायेतून केव्हाच बाजूला सरकला आहे. त्याची वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी गैरसोय होतेय. पण त्याच्या दोन पिढ्यांवर झालेल्या करिष्म्याचा परिणाम इतका खोलवर झालाय की त्याच पुण्याईवर शिवसेना नावाचा प्रादेशिक पक्ष ‘राष्ट्रीय’ होण्याचे प्रयत्न करतोय.

साठच्या दशकात मराठी तरुणांना भेडसावत होती सरकारी नोकरी आणि व्यवसायाची समस्या. त्यामध्ये अडथळा आणत होती दाक्षिणात्य अधिकार्‍यांची लॉबी. त्यांना आपली भूमिका समजावण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी ६०-७० च्या दशकात जे केलं त्यामुळे सेनेची प्रतिमा पूर्णत: गुंडागर्दी करणारी पार्टी अशी प्रतिमा झाली होती. पण त्याची शिवसेनाप्रमुखांना विशेष फिकीर नव्हती. कारण याचवेळी स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून रक्तदान, शैक्षणिक शिबिरं, रास्त दरात धान्यवाटप असं बरंच समाजकारणही सुरू होतं त्याचं प्रमाण सेनेनं ८० टक्के ठरवलं होतं. या सगळ्यावर बाळासाहेबांचा करिश्मा होता. कारण तेव्हा शिवसेना खर्‍या अर्थाने गरीब होती. तेव्हा अनेकांनी आपापल्या खिशाला चाट दिली. दरम्यानच्या काळात शिवसेनेनं महापालिकेच्या निवडणुका लढवल्या. सेनेचं महापालिकेतलं खातं उघडलं तेच मुळी ठाण्यात. तिथे नगर परिषद जिंकल्यानंतर शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली. मुंबई महापालिकेत शिरकाव करताना बाळासाहेबांनी अनेकांशी राजकीय हातमिळवणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने प्रजासमाजवादी मुस्लीम लीग यासारख्या पक्षांचाही समावेश होता. आपल्या स्थापनेच्या 29 वर्षांनंतर म्हणजे 1995 साली शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आली. त्याआधी सेनेनं वामनराव महाडिकांच्या रुपाने १९७१ सालीच विधानसभेत प्रवेश केला होता. निष्ठावंत शिवसैनिक हीच आपली शक्ती समजणार्‍या बाळासाहेबांनी सुरुवातीपासूनच स्वतःभोवतीच संघटनेतील सत्ताकेंद्र कौशल्यानं केंद्रित केलं होतं. बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाचे सर्वेसर्वा असं सुरुवातीपासूनचं सूत्र होतं. या सुत्राला कोणी आव्हान दिलं नाही असं नाही. कधी बंडू शिंगरे, कधी माधव देशपांडे तर कधी छगन भुजबळ यांनी आव्हान दिले. पण बाळासाहेब ठाकरे प्रत्येक वेळी वरचढ ठरले. आपल्या शिवसैनिकांना निवडणूक रिंगणात उतरवून त्यांना जिंकवून आणणं आणि त्यानंतर त्यांना आपल्या आदेशानुसार चालवणं यालाच बाळासाहेब ठाकरेंनी पसंती दिली. ते स्वत: मात्र निवडणुकीच्या भानगडीत पडले नाहीत. सेनेत हा प्रकार बाळासाहेबांच्या नंतर फक्त आनंद दिघे यांना यशस्वीपणे जमला.

- Advertisement -

ऐंशीच्या दशकात शिवसेनाप्रमुखांनी भाजपबरोबर युती केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली युती शिवसेनाप्रमुखांना खर्‍या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेली. १९९२ साली करसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला. भाजपाचे नेते याची जबाबदारी घ्यायला कचरत असताना शिवसेनाप्रमुखांनी त्याची जबाबदारी घेताना, “बाबरी पाडणार्‍या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे.” असं ठणकावून सांगितलं. त्यामुळे बाबरी पतनाच्या प्रकरणात बाळासाहेब ठाकरे आरोपी ठरले, पण त्याचवेळी ते समस्त हिंदूंचे नायक ठरले. सरसेनापती शिवसेनाप्रमुख या बिरुदांना मागे टाकून हिंदूहृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांच्या मागे लागायला सुरुवात झाली. बाबरी मशीदीचा ढाचा पडल्यानंतर मुंबईसह अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. या दंगलीच्या वेळी शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात हिंदुंचा कैवार घेतला आणि मुस्लिमांच्या अनेक मशिदी घरादारांची होळी केली. त्यामुळेही बाळासाहेबांची प्रतिमा अधोरेखित झाली ती अधिक ठळक करताना, ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ असं म्हणून नव्वदच्या दशकात टिपेला पोचलेल्या टोळीयुद्धाला बाळासाहेबांनी स्वतःचा आयाम दिला. अंडरवर्ल्डमधील अनेक मराठी तरुणांना बाळासाहेब ठाकरे आपले गॉडफादर वाटू लागले. त्यात खिमबहाद्दूर थापा, अमर नाईक, अश्विन नाईक, भाई ठाकूर यांचा समावेश होता. या सगळ्यांना बाळासाहेबांनी वेळोवेळी मदत केली. या मदतीचा परतावा या मंडळींनीदेखील बाळासाहेबांना यथावकाश केलेला आहे. एका बाजूला हिंदुंचा नेता अशी आपली ओळख बनवताना बाळासाहेबांनी दुसर्‍या बाजूला देशभरासह जगभराला मायानगरीमधील ज्या बॉलिवूडचं आकर्षण आहे त्या बॉलिवूडवर स्वतःची पकड जमवली. चित्रपट सृष्टीतील तंटेबखेडे, त्यांच्या वसुल्या, त्यांची लफडी यावर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी पद्धतीने न्याय देत एक समांतर ‘सरकार’ चालवण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूड आदराने बाळासाहेबांना कधी बालासाहेब म्हणून पुकारू लागली तर कधी डॅडी म्हणून त्यांचा उल्लेख करू लागली. आपल्या घरात शस्त्रे ठेवणार्‍या संजय दत्त याची कैफियत त्याचे वडील सुनील दत्त यांनी बाळासाहेबांकडे मांडली. आदल्या दिवशी संजय दत्तला देशद्रोही ठरवणार्‍या बाळासाहेबांनी अवघ्या बारा तासात त्याला उगवता सूर्य म्हणून प्रमाणपत्र दिलं. या सगळ्या प्रकारात बाळासाहेब आणि सुनील दत्त यांचा दोस्ताना हीच प्रमुख गोष्ट होती. आपल्या सगळ्या वाटचालीत बाळासाहेबांनी खूप गोष्टी कमावल्या. नाव, पैसा, लौकिक, दोस्त पण या सगळ्यात बाळासाहेब कशाने श्रीमंत होते तर सगळ्याच क्षेत्रात त्यांच्या असलेल्या मित्र परिवाराने आणि शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमामुळे. ते खर्‍या अर्थाने प्रेमाचे कुबेर होते.

१९९५ साली महाराष्ट्रात युती सत्तेवर आली. बाळासाहेब ठाकरे आपल्या ‘रिमोट कंट्रोल’ ने सत्तेचा शकट हाकत होते. रिमोट कंट्रोल बाळासाहेबांचा असल्याने मुख्यमंत्री मनोहर जोशी आहेत की, नारायण राणे याने शिवसैनिकांना फार फरक पडत नव्हता. जोशींना उठवून राणेंना बसवणं या निर्णयामुळे बाळासाहेबांनी एक मेसेज दिला, मी कुणालाही ‘हिरो’ आणि कुणालाही ‘झिरो’ करु शकतो. ठाकरेंच्या या धक्कातंत्राने सगळ्यांनाच धक्का बसला. सेनेच्या नेत्यांसह भाजपच्या नेतृत्वाला अगदी ठाकरे कुटुंबातील सदस्यांनाही… अर्थात ही एका रात्रीत घडलेली ही घटना नव्हती… यासाठी राणेंनी खूप आधीपासून यावर काम सुरू केले होते. ते मुख्यमंत्रीपदाच्या बेगमीचे होते का तर त्याचं उत्तर नाही असं असेल. पण बाळासाहेब नावाच्या परिसाचा मंत्र आपल्याला कसा मुखोद्गत होईल याची काळजी बेस्टच्या अध्यक्षपदापासूनच केली. राणे बेस्टचे अध्यक्ष झाल्यानंतरच शिवसेनेला खर्‍या अर्थाने लक्ष्मीदर्शन सुरु झालं. त्यात राणेंची भूमिका लक्षणीय होती. तेव्हा बाळासाहेबांनी विचारले, हे आताच कसे झाले. याच्याआधी का नाही झाले? तेव्हा राणे म्हणाले, ते मला माहीत नाही, पण अध्यक्षाची कामगिरी मी पार पाडतोय. या घटनेनं सेनेला तोपर्यंतचा सर्वाधिक एकरकमी पक्ष निधी मिळाला होता. राणेंना शिवसेनाप्रमुखांच्या दालनात पोचण्यासाठी रेड कार्पेट मिळालं होतं. त्याचा त्यांनी आपल्या राजकारणासाठी आणि ब्रँडिंगसाठी खूपच छान फायदा उठवला. त्याच जोरावर आमदार, कार्यकर्ते यांच्याकडे राणेंनी आली वट जमवली होती.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण, या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनेकांनी घ्यायला सुरुवात केली होती. त्या सगळ्यांना एकच उत्तर ठाऊक होतं ते म्हणजे राज ठाकरे. ज्यांनी तरुणपणी नव्हे तर अगदी लहानपणापासून आपल्या काकांचा कित्ता गिरवायला सुरुवात केली होती. त्याचवेळी उध्दवचं काय होणार? या प्रश्नाने मीनाताई ठाकरेंना चिंतावले होते. या चिंतेतून त्यांनी मातोश्रीवर एका ज्योतिषाला बोलावले होते, ते ज्योतिषी बाळासाहेबांच्या समोर आल्यावर ते म्हणाले, तुमचं कुंडली-बिंडलीचं गणित नंतर मांडा, माझ्या खुर्चीवर माझा दादूच (उध्दव यांचं कौटुंबिक नाव) बसणार…ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शिवसेना भविष्यात उध्दव चालवणार यावर स्वत: त्यांनीही विश्वास ठेवला नसता. तेव्हा उध्दव ठाकरे प्रभादेवीच्या नागुसयाजीच्या वाडीतील ‘सामना’त विश्वस्त म्हणून काम पहात होते. आपल्या फोटोग्राफीत रमत होते. त्यामुळे भविष्यात सबकुछ राज ठाकरे असंच वाटायचं. आज उध्दव यांच्याभोवती हजारोजण आहेत. पण ‘सामना’तील त्यांच्या दालनाबाहेर एकमेव भक्त दिसायचा ते गृहस्थ म्हणजे कुर्ल्याचे भाऊ कोरगांवकर. नवभक्तांच्या गराड्यात ते पार हरवले होते. अगदी परवा त्यांना म्हाडाच्या रिपेअर बोर्डाचे औटघटकेचं सदस्यपद मिळालेय.
शिवसेना आज गल्ली ते दिल्ली सगळीकडेच सत्तेत आहे. त्याचं श्रेय उध्दव ठाकरेंना आहेच, पण त्याहीपेक्षा ते शिवसैनिकांचं श्रेय अधिक आहे. २००५ साली राणेंना पक्षातून काढून टाकल्यावर दुसर्‍यांदा शिवसेनेला मोठा धक्का बसला. आधी छगन भुजबळांबरोबर १८ आमदार गेले होते. राणेंबरोबर १२ आमदार गेले. पण या खेपेस शिवसेना संपवू असा विडा राणेंनी उचलला होता. तेव्हा यातून शिवसेना खरंच सावरणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ज्या कोकणी माणसाच्या विशेष प्रेमामुळेच सेनेला सत्ता मिळाली, तोच राणेंच्या हकालपट्टीने दुखावला होता.

राणे सेनेच्या आणि उध्दव यांच्या मागे हात धुवून लागले होते. आमदार, नगरसेवकांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटत होती. राणेंपाठोपाठ राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी तर मराठी कार्ड वापरत सेनेचा दम काढला. कधी नव्हे तो सेनाभवन आणि लालबाग परळचा आमदार सेनेनं गमावला. परळ, लालबागवर भगव्याची जागा मनसेच्या झेंड्याने घेतली आणि उध्दव यांची अस्वस्थता वाढली. राणे आणि राज यांच्याकडून उध्दव ठाकरेंवर राजकीय आणि व्यक्तिगत हल्ले होत होते. ते इतके पराकोटीचे होते की, साधारण मनाचा माणूस कोलमडून गेला असता. पण उध्दव यांनी कमालीचा संयम दाखवला. हा संयम दाखवताना त्यांनी आपल्या त्याच थिंक टँकवर भरवसा ठेवला. मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, विनायक राऊत, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यातही नार्वेकर-देसाई हिटलिस्टवर होते. उध्दव यांनी शेवटपर्यंत या दोघांनाही दूर केलेलं नाहीय. राणे-राज यांच्या एक्झिटनंतर उध्दव यांनी शिवसैनिकांना जोडीला घेतलं, पण पक्षाबाहेरच्या नेत्यांचीही यशस्वी साथ मिळवली. कधी त्यांनी राष्ट्रवादीत असलेल्या दीपक केसरकरांना, उदय सामंतांना सेनेत आणण्याची खेळी केली. तर कधी काँग्रेसच्या नेत्यांना जोडीला घेऊन संयमी खेळी केली. अस्तित्वाची लढाई लढताना ज्यांनी मदत केली त्यांना परतावा देताना निष्ठावान सैनिक मात्र राजकीय लाभापासून लांबच राहिलाय. अगदी परवाही तानाजी सावंत मंत्री झाले तेव्हा तर सेनेत दबक्या आवाजात ‘डील’चीच चर्चा होती.

राजकारणाचा पोत बदलतोय…‘डील’ सेनेतच होतायत असं काही नाही. भाजपही गल्ली ते दिल्ली तेच करतंय. त्यांनी तर असे मासे आपल्या फिशपाँडमध्ये सोडलेत की, विचारता सोय नाही. त्यांचे रंग, ढंग सगळंच विलक्षण. याच सगळ्यांच्या जोरावर ८० च्या दशकातील छोटा भाऊ २५ वर्षांत मोठा भाऊ झालाय…आता त्याचीच ऊर्जा घेऊन शिवसेनेच्या तिसर्‍या पर्वाची सुरुवात झाली आहे. ते पर्व आहे आदित्य ठाकरेंचं. बाळासाहेबांच्या पिढीनं मनगटाच्या ताकदीवर सेनेचा डोलारा उभारला. उद्धव यांच्या कार्यकाळात संयमाच्या जोरावर गल्ली ते दिल्ली सत्तेचा तारू मार्गक्रमण करतोय. पण आता आदित्य यांना राजकारण करताना एका विलक्षण ऊर्जेची गरज लागणार आहे. ती ऊर्जा त्यांना आपले सहकारी, आपले समर्थक आणि राजकीय व्यवस्थेतून उभी करावी लागणार आहे. बाळासाहेबांच्या मनगटी शिवसेनेला उद्धव यांनी दिलेल्या कॉर्पोरेट लूकला आता डिजिटल तत्त्वावर घेऊन जाण्याचे काम आदित्य यांना करायचे आहे, पण ते करत असताना मागच्या विधानसभेला जशा चुका झाल्या तशा आगामी काळात आदित्य यांच्याकडून झाल्या तर मात्र अतिमहत्त्वाकांक्षी भाजपासमोर शिवसेनेचा टिकाव लागणार नाही, असे राजकीय चित्र आहे. त्यामुळेच उद्धव यांनी दोन पावले मागे जात राजकीय तह केला आहे. आजपर्यंत शिवसेनेच्या वर्धापन दिनाला फक्त पक्षाचे प्रमुख हेच आकर्षणाचा केंद्र असायचे. त्यांचे भाषण येणार्‍या काळासाठी, येणार्‍या वर्षासाठी ऊर्जेची शिदोरी असायची.

आजचा वर्धापन दिन हा ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेसाठी सगळ्यात महत्वाचा दिवस असणार आहे. या ऐतिहासिक दिवसाला सेनेनं आपल्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं आहे. काही वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा असताना शिवसेनाप्रमुखांचे भाषण संपल्यावर जनसमुदायाने सभास्थान सोडून निघायला सुरुवात केली. भाजपाचे नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण सुरू होण्याआधी शेकडो शिवसैनिकांनी चौपाटी सोडायला सुरुवात केलेली बघून वाजपेयींची अस्वस्थता वाढली. हे शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आले त्यांनी माईकचा ताबा घेत आपल्या सैनिकांना आदेश दिला. असाल तिथे बसून घ्या वाजपेयींचे भाषण अजून व्हायचं आहे, ते आपल्यासाठी आदरणीय आहेत. शिवसेनाप्रमुखांचे शब्द कानी पडताच त्यांचे सैनिक तिथल्या तिथे थांबले. वाजपेयींचे भाषण त्यांनी तन्मयतेने ऐकले आणि सभा संपन्न झाली. मुंबईमध्ये सेनाप्रमुखांनी दिल्लीच्या नेत्यांचा मान राखण्याचे ते दिवस होते. बाळासाहेबांनी दिलदारपणे तो मान राखला. केंद्र आणि राज्यातील सत्ता आणि त्या सत्तेतून आलेला अमर्याद लाभ याच्या जोरावर आज दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र कमालीचे ताकदवान झाले आहेत. त्यात शिवसेनेचे योगदान नक्कीच आहे, पण याचा शिवसेनेला राजकीय सत्ता टिकवण्यासाठी आणिअसलेली सत्ता पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचविण्यासाठी मंत्रालयातल्या सत्तेची गरज आहे आणि ही गरज भागवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा राजकारणात असूनही सभ्य असणारा समजूतदारपणे वागणारा मित्र उद्धव यांना आणि शिवसेनेला हवा आहे. म्हणूनच 54 व्या वर्धापन दिनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलंय. आजच्या घडीला सुदामाच्या घरी श्रीकृष्ण जाण्यासारखी परिस्थिती आहे. या परिस्थितीत बदल करण्यासाठी तिसर्‍या पिढीला सुरक्षित आणि राजकीय सुस्थितीत ठेवण्यासाठी तडजोड करावी लागणार आहे. वीस वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलेला मनाचा मोठेपणा येणार्‍या काळात देवेंद्र आणि नरेंद्र यांनी दाखवला तरच सेना-भाजपची मैत्री युती आणि शिवसेनेचा करिष्मा आणि ऊर्जा दोन्ही टिकणार आहेत. अर्थात दोन्ही बाजूला प्रमुखपदी सभ्य-सुसंस्कृत, संस्कारी आणि चारित्र्यवान नेते बसले आहेत. ते दोघेही आपापल्या कामात कमालीचे गंभीर आहेत. पण “पॉलिटिक्स इज डर्टी गेम” असं म्हटलं जातं. अर्थात, हा डर्टी गेम हे दोन्ही सभ्य गृहस्थ कसे खेळतात, यावर उभय बाजूंचे यशापयश अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -