पहाडी गोरेगावमध्ये मुंबईकरांसाठी ६५०० घरे

१८ एकर भुखंडाचा वाद मिटल्याचा परिणाम

mumbai
Mhada lottery 2018
म्हाडा

म्हाडाकडे येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होणार आहेत. पहाडी गोरेगावच्या प्रकल्पाच्या ठिकाणची ६५०० घरे मुंबईतील नागरिकांसाठी उपलब्ध होतील. गोरेगावमध्ये १८ एकरच्या भुखंडाची लढाई म्हाडाने कोर्टात जिंकल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर याठिकाणी घरे उभारणे शक्य होणार आहे. येत्या तीन महिन्यांत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. म्हाडाच्या हाऊसिंग स्टॉकपैकी अनेक प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत. पण त्यासाठीचे सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हाडा प्राधिकरणाची संपूर्ण राज्यात किती जमीन उपलब्ध आहे याचा आढावाही येत्या ४० दिवसांत घेतला जाणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

म्हाडाकडे असलेल्या भूखंडावर पुनर्विकास होताना हाऊसिंग स्टॉक म्हणजे घरांच्या उपलब्धतेच्या तुलनेत प्रिमिअम भरण्यासाठीचा कल दिसून येत आहे. तर अनेक प्रकल्पातील हाऊसिंग स्टॉकची प्रकरणे न्यायालयात अडकली आहेत. गोरेगावची पत्रा चाळ हे त्याचेच उदाहरण आहे. पत्राचाळीतील ३०६ घरांची लॉटरी काढूनही अद्यापही याठिकाणी ताबा मिळवता आला नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडामार्फत अशा न्यायप्रविष्ठ प्रकरणांसाठी कायदा विभागाच्या टीमकडून मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच पत्राचाळीतील विषय सोडवण्यात येेईल असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात पत्राचाळीसारखी प्रकरणे समोर येऊ नयेत यासाठी म्हाडा प्राधिकरण काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे तसेच वर्तक नगर भागात पोलिसांसाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बाबतीत पोलिसांच्या घराबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे पोलिसांच्या विषयाबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे, असे सामंत म्हणाले.

४४ सेंकदापेक्षाही कमी वेळात सोडत

म्हाडाच्या यंदाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी प्रत्येक प्रवर्गानुसार काढण्यात येणार्‍या लॉटरीसाठी ४४ सेकंदाचा लागणारा वेळ कमी करण्याबाबत म्हाडा प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढच्या लॉटरीमध्ये ४४ सेकंदाहून कमी वेळात प्रत्येक प्रवर्गानुसार सोडत निघेल असा प्रयत्न म्हाडाच्या आयटी विभागाकडून होत आहे. यापुढच्या लॉटरीमध्ये हा वेळ कमी करण्यात येईल. म्हाडाच्या घरांसाठीच्या सोडत प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर सकाळी सात वाजल्यापासून सगळी प्रक्रिया वेबकास्टिंगमार्फत पाहता येईल. निवडणूक केंद्राच्या ठिकाणी जशी पारदर्शकता ठेवण्यात येते तसाच प्रयत्न लॉटरीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेत पारदर्शकतेचा भाग म्हणून दक्षता विभागातील पदांची संख्या वाढवावी म्हणून शासनाकडे विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या विभागातील पदांच्या भरतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे म्हाडाचे घर मिळवून देण्यासाठीचे एजंटमार्फत फसवणूक करण्याचे प्रकारही कमी होतील.

म्हाडाच्या भूखंडाचा आढावा
म्हाडाचे संपूर्ण राज्यात भूखंड आहेत. सध्या या भुखंडांच्या माध्यमातून एकूण किती जागा उपलब्ध आहे याचा आढावा म्हाडा प्राधिकरणाकडून घेण्यात येणार आहे. सध्या मुंबई, कोकण, अमरावती, नाशिक यासारख्या ठिकाणी म्हाडाचे भूखंड आहेत. भुखंडाचा एकूण आढावा घेऊन ४० दिवसांत म्हाडा प्राधिकरण या माहितीचा अहवाल तयार करणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here