रेल्वे रुळालगत ७८२५ बेकायदा झोपड्या

पंजाबसारखी भीषण दुर्घटना मुंबईत होण्याची शक्यता

Mumbai
बेकायदा झोपड्या

पंजाबमध्ये रावण दहनाच्या वेळी रेल्वेने चिरडल्याने 62 लोकांचा मृत्यू झाला होता. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमुळे अशी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गालगत तब्बल ७ हजार 825 झोपड्या दाटीवाटीने उभ्या राहिल्याचा अहवाल मार्च २०१८ अखेर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वे घसरण्यासारखी एखादी दुर्घटना घडल्यास पंजाबपेक्षा मोठा अपघात होऊ शकतो.मुंबई उपनगरीय रेल्वेरुळांना मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्यांसह बांधकामांचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे लोकलचा वेग वाढवणे, ट्रॅकवरील दुरुस्ती करणे व अन्य विकासकामे करण्यात रेल्वेला अडचणींचा सामना करावा लागतो.

रेल्वे मार्गालगत असलेल्या बेकायदा झोपड्यां-संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी अनेकदा सर्वेक्षण करून त्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीत ३१ ठिकाणी तर पश्चिम रेल्वेवर १७ ठिकाणी बेकायदा झोपड्या बांधल्या आहेत. मध्य रेल्वेवर ५ हजार ७८४ तर पश्चिम रेल्वेवर १ हजार ९५२ झोपड्या अशा तब्बल सात हजार ८२५ बेकायदा झोपड्या रेल्वेमार्गालगत आहेत. यासंदर्भात छायाचित्रासह सर्व माहिती असलेला अहवाल पोलिसांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय महा-व्यवस्थापकांना दिला आहे. परंतु या अहवालाची कोणतीही दखल रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत नाही.मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकावर सर्वाधिक दोन हजार ९४ झोपड्या आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली रेल्वे स्थानकाच्या हद्दीत १ हजार ४०२ झोपड्या असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ता समीर झवेरी यांना माहिती अधिकारातून मिळालेली आहे.

रेल्वेचे नियंत्रण नाही

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील माटुंगा स्थानकासह, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसर, वांद्रे, विक्रोळी अशा काही ठिकाणी रेल्वे मार्गाशेजारी झोपडपट्ट्या पसरल्या आहेत. स्थानकाकडील भिंतीलगतही बर्‍याचशा झोपड्या, वस्त्या आहेत. या वस्त्यांतून रेल्वेमार्गांवर कचरा फेकला जातो. अनेकदा चालत्या लोकलवर दगड फेकण्याचे प्रकारही होतात. मात्र यावर रेल्वे प्रशासनाला आतापर्यंत नियंत्रण मिळवता आलेले नाही. रेल्वेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण करणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

बेकायदा झोपड्या उभ्या राहत असताना कारवाई का केली नाही? लोहमार्ग पोलिसांकडून प्रशासनाला अहवाल देऊनही आठ महिने उलटले तरी कारवाई का होत नाही. प्रशासनाने बेकायदा झोपड्यांना आळा घालणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
– समीर झवेरी, आरटीआय कार्यकर्ता.

राजकीय दबावामुळे कारवाई नाही

वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ हार्बर मार्गावर अगदी रुळांशेजारी वस्ती आहे. इथल्या झोपड्या काही दिवसांपूर्वी हटवल्याने पंजाबची पुनरावृत्ती टळली. पण, अजूनही काही भागात रेल्वेमार्गांजवळच्या वस्तीमुळे ही परिस्थिती ओढवू शकते. हार्बर, मध्य रेल्वेवरील वेगवेगळ्या स्थानकांप्रमाणेच माहीम-माटुंगा मार्गावरील दुर्गंधी, अस्वच्छता ही कायमस्वरूपी समस्या आहे. विविध पक्षांच्या दबावामुळेच रेल्वे स्टेशनजवळील झोपड्यांवर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जाते.

रेल्वे परिसरात बेकायदा झोपड्या

सीएसटीएम १००१
दादर १८८२
कुर्ला २०९४
डोंबिवली ७३०
वडाळा ४०
वाशी १२६
वांद्रे ५५०
बोरिवली १४०२
एकूण ७८२५

पश्चिम रेल्वेकडून वेळोवेळी रेल्वेच्या जागेचे सर्वेक्षण होते. सर्वेक्षणानंतर बेकायदा झोपड्या बांधणार्‍यांना नोटीस देऊन आम्ही निष्कासनाची कारवाई करतो.
– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here