बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे पनवेलमधील ८० एकर जागा हडप

Mumbai
फोटो प्रातिनिधीक

बनावट शेतकरी बनून खोटे प्रमाणपत्र सादर करून नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक भुपेंद्र शहा यांनी गव्हाण येथील ट्रस्टची तब्बल ८० एकर दलदलीची व खारफुटीची जमीन हडप केली, असा खळबळजनक आरोप रिगल हेबीटेंट प्रा लिमिटेडचे पदाधिकारी विक्रम भणगे यांनी केला. या प्रकरणी नाव्हा शेवा पोलीस ठाण्यात भुपेंद्र शहा यांच्यासह इतर ७ जणाविरुद्ध ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, आणि ३४ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुपेंद्र शहा, किरण दांड, हारून अलीम युसुफ, बाज खान, शैलेज जाधव, सुरेश शेडगे, रमेश भालेराव व त्याचा सहकारी अशा एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांनी लातूर येथील शेतकरी असल्याचा बनावट दाखला तयार करून गव्हाण येथील महम्मद युसुफ ट्रस्टची ८० एकर जागा फक्त चार लाखात खरेदी केली. तीच जमीन महसूल व सिडकोच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून जमिनीवर खारफुटी नसल्याचे दाखवून जबरदस्तीने सिडकोच्या घशात घालण्याचा प्रयत्न शहा यांच्याकडून सुरू असल्याचा प्रकार भणगे यांनी उघडकीस आणला.

राज्यात शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असणे गरजेचे आहे. त्यामुळे शहा यांनी सन २००७ मध्ये लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खुटेगाव गावातील आपण रहिवासी असल्याचे भासवून त्याच गावातील २१ गुंठे जमीन ५१ हजार रुपयांत खरेदी केल्याचे बनावट कागदपत्रे तयार केले. त्यानंतर त्या कागदपत्रांच्या आधारे औसा तहसीलदाराकडे ६ डिसेंबर रोजी शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे ज्या दिवशी अर्ज केला त्याच दिवशी खुटेगावचे तलाठी यांनी भूपेंद्र मुरजी शहा नावाने दाखला सादर केला.

ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्याच दिवशी दाखला मिळाल्याने शहा यांनी अधिकार्‍याचीही फसवणूक केल्याचा प्रकार भणगे यांनी उघडकीस आणला आहे. महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारून अली ए.आर.युसुफ याने जमीन विकताना स्वतःच बनविलेल्या ठरावात सदर जमीन ही दलदलीची आणि पूर्णत: खारफुटीची असल्याने चार लाखात विकत असल्याचे नमूद केले आहे. असे असताना सदर खारफुटीयुक्त जमीन सिडको अधिकार्‍यांना हाताशी धरून सिडकोला संपादित करण्यास भाग पाडून त्याद्वारे साडेबावीस टक्के भूखंड योजनेंतर्गत सुमारे ५०० कोटींची ५० हजार मीटर जमीन सिडकोकडून घेण्याचा डाव बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहा याने आखला आहे.

या जमिनीवर अडीच हजार कोटींचा गृहप्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस असल्याने महसूल व सिडको अधिकार्‍यांना हाताशी धरून हा भूखंड घोटाळा करण्याचा डाव शहा यांचा असल्याचा आरोपही भणगे यांच्याकडून करण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी नाव्हा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यावर कठोर पावले उचलतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे यावेळी भणगे यांनी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here