घरमुंबईनिष्काळजीपणे गाडी चालवणार्‍यांना चाप; २०१९ मध्ये सर्वात मोठी कारवाई

निष्काळजीपणे गाडी चालवणार्‍यांना चाप; २०१९ मध्ये सर्वात मोठी कारवाई

Subscribe

जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत राज्यात एकूण १२ हजार ५५८ वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. यापैकी मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ८४५ लायसन्स निलंबित केले आहेत.

राज्यातील वाढते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहन चालकांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत राज्यात एकूण १२ हजार ५५८ वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. यापैकी मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ८४५ लायसन्स निलंबित केले आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, असा प्रश्न आमदार निर्मला गावित यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या प्रश्नाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तर देताना कारवाईसंदर्भात माहिती दिली.

वाढते अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २०१८ पेक्षा चालू वर्षात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०१८ मध्ये राज्यात १३ हजार ४७४ वाहनधारकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले होते. यापैकी मुंबईत फक्त ४२ लायसन्स निलंबित झाले होते. वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी परिवहन खात्याने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरात कारवाईचा फास घट्ट करण्यात आला आहे. २०१८ साली ज्याठिकाणी केवळ ४२ लायसन्स निलंबित झाले होते, त्याठिकाणी यावर्षी पहिल्या तीनच महिन्यात ८४५ लायसन्स निलंबित झाले आहेत.

- Advertisement -

शिवडी अपघातातत दोन जणांचा मृत्यू 

मुंबईतील शिवडी येथे काही दिवसांपूर्वीच झकेरिया बंदरजवळ एका गाडीला ओव्हरटेक करताना अर्टिगा गाडीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर सहा लोक गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर शिवडी येथे काही काळ तणाव पसरला होता. बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे असे अनेक अपघात मुंबई आणि उपनगरात घडत असतात. परिवहन विभागाने सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे अपघातांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -