कर्मचारी तुटवड्यामुळे रेल्वे तिकीट घरांना टाळे

तिकिटासाठी प्रवाशांची होते दमछाक

Mumbai
chichapokali Ticket window

सध्या रेल्वे सेवेला मोठ्या प्रमाणात कर्मचारी तुटवडा जाणवत आहे. या कर्मचारी तुटवड्याचा थेट परिणाम रेल्वे सेवेवर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटही मिळणे अवघड बनू लागले आहेत. कारण मुुंबईतील काही रेल्वे स्थानकांतील तिकीट घरांनाच रेल्वेने टाळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिकिटासाठी जाळीतून हात घालून एटीव्हीएम मशीनमधून कार्ड स्वॅप करून प्रवाशांना तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे, तसेच त्यांना मनस्तापही सहन करावा लागत आहे.

दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. ही संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. इतक्या प्रवाशांना तिकीटे देण्याचे काम तिकीट घरांवर केले जाते. मात्र आता कर्मचार्‍यांच्या अभावामुळे ही तिकीट घरे बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली आहे. तशी कबुलीही रेल्वे प्रशासनाने फलक लावून दिली आहे. सध्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकाकडील तिकीट घरावर टाळे ठोकण्यत आले आहे.येथील रेल्वे स्थानकावरच्या सीएसएमटीकडील पुलावरील तिकीट घर अशा प्रकारे बंद करण्यात आले आहे. या तिकीट घराचे प्रवेशद्वार ग्रील लावून त्याला टाळे ठोकून बंद करण्यात आले आहे. त्याठिकाणी रेल्वे प्रशासनाने फलकही लावला आहे. त्यामध्ये ‘कर्मचारी नसल्याने ही तिकीट खिडकी सकाळी 8 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत फक्त सूरू असणार आहे’ असे म्हटले आहे.

प्रत्यक्षात मात्र ही तिकीट खिडकी दुपारी 12 वाजल्यानंतरही बंद असते. त्यामुळे सकाळी या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना पूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून कल्याणच्या दिशेने असलेल्या तिकीट घराकडे जावे लागते. तेथेही प्रवाशांना कसरत करावी लागते. त्या ठिकाणी ज्या प्रवाशांकडे एटीव्हीएम कार्ड असेल, त्यांनाच तिकीट काढणे शक्य होत आहे. हे प्रवासी त्यांच्याकडील स्मार्ट कार्ड बंद जाळीतून आत घालून तेथे असलेल्या एटीव्हीएम मशीनमधून स्वॅप करून तिकीट काढत आहेत. त्यामुुळे प्रवासी संतापले आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या बैठका ठरल्या निष्फळ
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 1 लाख 25 हजार कर्मचारी आहेत. त्यात सुमारे २0 टक्के कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल हे स्वत: मुंबईचे असून त्यांचे विशेष लक्ष हे मुंबई रेल्वेवर असते. ते सतत रेल्वे अधिकार्‍यांबरोबर बैठका घेत असतात. मात्र चिंचपोकळी येथील तिकीट घराची अवस्था पाहिल्यावर या बैठका निष्फळ ठरल्या का, असा प्रश्न पडतो.

चिचंपोकळी रेल्वे स्थानकावर नेहमी तिकीट घर बंद अवस्थेत असते. त्यामुळे आम्हाला नेहमीच रेल्वे स्थानकाच्या
दुसर्‍या टोकाला जाऊन तिकीट काढावे लागते. यासंबंधी तक्रारी करुन सुध्दा रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही.
– नम्रता परमार, महिला रेल्वे प्रवासी

चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवरील होणार्‍या प्रकाराची माहिती घ्यावी लागेल. त्यांनतर आम्ही या प्रकरणाची चौकशी करू.
– ए.के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here