घरमुंबईभाईंदरमध्ये चोरीला गेलेला तलाव सापडला

भाईंदरमध्ये चोरीला गेलेला तलाव सापडला

Subscribe

खोदकामाचा रात्रीस खेळ चाले

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे येथे असलेला सर्व्हे नंबर 90 याठिकाणी 8 हजार चौ.मी. परिसरावरील चोरीला गेलेला सरकारी तलाव अखेर शेवटी सापडला आहे. महसूल विभागाने त्याचा शोध घेतला आहे. हॉटेल व्यावसायकाने हा तलाव चोरला होता. याविषयी आदिवासींसह श्रमजीवी संघटनेच्या तक्रारींवर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालय टाळाटाळ करीत आहे, अशी दैनिक ‘आपलं महानगर’मधून टीकेची झोड उठताच आता तलाव चोरांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करुन सरकारी तलाव परत करण्याचे काम सुरू केले आहे. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी मात्र तलाव चोरीला गेला नसून त्याचे उलट सुशोभिकरण केल्याचा दावा करत दुसराच तलाव दाखवला होता. पण रविवारी रात्रीच्या अंधारात तलावाचे खोदकाम सुरू केल्याने तलावचोरांचे पितळ उघडे पडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.

वरसावे नाक्यावरील एक्स्प्रेस इन हॉटेलकडून जाणार्‍या रस्त्यावर मेहतांच्या निकटवर्तींयांच्या कंपनीचे हॉटेल आहे. याभागातील जवळपास सर्वच जमीन हॉटेलच्या ताब्यात असून याठिकाणी लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यात डोंगर असून पावसाळ्यात येणारे पाणी खाली खाजगी जागेत नैसर्गिकरीत्या साचून तलाव व पाणथळ आहेत. वन हद्द असल्याने त्या लगतचा परिसरदेखील इको सेंसेटिव्ह झोनमध्ये येत आहे. याच वनहद्दीलगत सर्व्हे क्र. 90 मध्ये पूर्वीपासूनचे नैसर्गिक पाणथळ तलाव होता. सातबारा नोंदीदेखील हा तलाव सरकारी असल्याची नोंद असून त्याचे सुमारे 8 हजार चौ.फूट इतके क्षेत्र आहे. या सरकारी तलावाचा पूर्वीपासून आदिवासी वापर करत आले आहेत.

- Advertisement -

या कंपनीने सातबारा नोंदी सरकारी तलाव असताना या जागेत भराव सुरू केला होता. एप्रिल 2016 पासून आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने त्यावेळी आमदार नरेंद्र मेहतांचे नावानिशी तलावात भराव केल्याची तक्रार केली होती. सतत तक्रार अर्ज देऊनदेखील जिल्हाधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त अधिकारी तसेच महापालिका आयुक्त व पालिका अधिकार्‍यांनी राजकीय वरदहस्तामुळे कोणतीच कारवाई केली नाही. दुसरीकडे बेधडक भराव सुरुच ठेवण्यात येऊन तलावच बुजवून व सभोवताली कुंपण घालून लॉन बनवण्यात आले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व तत्कालीन महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तलाव चोरणार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम केले असे आरोप होत होते.
गेल्या मंगळवारी श्रमजीवी संघटनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. त्यात वरसावेचा सरकारी तलाव चोरीला गेल्याचा मुद्दा संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे मांडला होता. पण आयुक्तांनी चक्क तो तलाव सरकारी असून पालिकेला हस्तांतरीत झालेला नाही, असे सांगून आपले हात झटकले होते. परंतु याप्रकरणी दैनिक महानगरने बातमी प्रसिध्द केल्यानंतर मात्र सरकारी यंत्रणा हालचाल करु लागली. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी महसूल अधिकार्‍यांनी जाऊन केली. तर दुसरीकडे ही कंपनी आणि हॉटेलशी आपला संबंध नसल्याचे सांगणार्‍या नरेंद्र मेहतांनी मात्र सरकारी तलाव चोरीला गेल्याचे खोटे असून तलाव जागेवर आहे आणि त्याठिकाणी सुशोभिकरण केल्याचे सांगत तलाव असल्याचे फोटो दाखवले होते.

पण मेहतांनी दाखवलेले फोटोच खोटे असून ते जवळ असलेल्या दुसर्‍या तलावाचे आहेत. सरकारी तलावाचे नाहीत असे श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, रवींद्र गायकर आदींनी स्पष्ट केले. महापालिका व महसूल प्रशासन सरकारी तलाव चोरीला जाण्यास कारणीभूत असून तलाव चोरणारे मेहता व त्यांच्या कंपनीचे लोक असल्याने त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा थेट आरोप श्रमजीवीने केला.

- Advertisement -

दरम्यान, मेहता यांनी तलावासंबंधी होत असलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सदर हॉटेलशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. सातबारा उतार्‍यात आणि गुगल नकाशावर सदर जागेवर तलाव असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून वरिष्ठांना पाठवण्यात आला असून वरिष्ठांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती घोडबंदरचे तलाठी अभिजित बोडके यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -