घरमुंबईअसुविधेचे बस स्थानक

असुविधेचे बस स्थानक

Subscribe

प्रवाशांना बस कुठे उभी राहते हे समजावे यासाठी बेस्टने शहरात ठिकठिकाणी थांबे उभारले आहेत. यातील काही थांब्यांना शेड उभारली आहे, तर काही ठिकाणी जागेअभावी नुसतेच खांब लावले आहेत. परंतु प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या या बस थांब्यांचीच दुरवस्था झाल्याने ते गैरसायीचे ठरत आहेत. अनेक ठिकाणी जागा असतानाही खांबे उभारल्याने प्रवाशांना उन्हा-पावसातच बसची वाट पाहत थांबावे लागते. तर अनेक ठिकाणी बसथांब्याच्या आसपास प्रंचड घाण, गाड्यांची पार्किंग व बसथांब्यासमोर मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्यात येते. त्यामुळे प्रवासी बसथांब्याचा वापर करण्याऐवजी रस्त्यावरच उभे राहणे पसंत करतात. तर अनेक ठिकाणचे बसथांबे हे झाडाझुडपात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांब्याची ही दुरवस्था लवकरात लवकर सुधारावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मुंबईची सर्वात महत्त्वाची प्रवासी सेवा म्हणून ओळखल्या जात असलेल्या बेस्टच्या थांब्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी गाड्या बस थांब्याबाहेरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि बेस्टच्या बसगाड्या उभ्या करण्यातही अडचणी येतात. इतकेच नव्हे तर फेरीवाले, खासगी वाहनचालकांच्या गराड्यात मुंबईकर अडकून पडतात.
बेस्ट प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. सध्या प्रवाशांची संख्या 28 लाख आहे. एकेकाळी बेस्ट प्रवाशांची संख्या 42 लाख होती. सध्या बेस्ट परिवहन विभागाच्या अंतर्गत 28 बेस्ट डेपो, 6 हजार 324 बस थांबे आहेत. यामध्ये सरासरी बस थांबे (खांब) 3 हजारांपेक्षा जास्त आहे, तर बस आश्रयस्थानके 3 हजार आहेत. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणांकडील बस थांबे स्टीलचे केले आहेत. ऊन आणि पावसापासून प्रवाशांचे रक्षण व्हावे यासाठी बस थांब्यांवर शेडही टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या बस आश्रयस्थानकांमध्ये गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. बस थांब्यांबाहेरील जागेचा वापर खासगी गाड्या उभ्या करण्यासाठी होत आहे. त्यामुळे अनेक वेळा प्रवासी वैतागून ऑटो-रिक्षा किंवा अन्य पर्याय निवडतात. याचा परिणाम बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नावर होत आहे.

काय म्हणतो नियम?

नियमानुसार बेस्ट बस थांब्यापासून १५ मीटरपर्यंत गाडी पार्क करण्यास सक्त मनाई आहे. तरीही सर्व नियम धाब्यावर बसवून बस थांब्याजवळ गाड्या पार्क केल्या जातात. फेरीवाल्यांनीही त्यांचे बस्तान बस थांब्यावर बसवले आहेत. जे.जे. उड्डाणपुलाखाली असणारे बस थांबे तर फेरीवाले व गाडी पार्क करणार्‍यांच्या मालकीचेच बनलेले आहेत. दादर, मुंबई सेंट्रल, अ‍ॅन्टॉप हिल, घाटकोपर, मालाड मालवणी, गोरेगाव या भागातील बस थांबे फेरीवाले व गाडी पार्क करण्यासाठी आंदण दिल्याचे दिसून येते. तर काही बस थांब्यांचा आधार घेऊन झोपड्या उभ्या राहिल्या आहेत.

- Advertisement -

अतिक्रमित स्टॉपकडे दुर्लक्ष

बेस्ट उपक्रमाच्या अनेक बस स्टॉपवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. अशा बस स्टॉपला भेट देऊन फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची घोषणा तत्कालीन बेस्ट समिती अध्यक्षांनी केली. मात्र त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला तरी त्यांना अशा बस स्टॉपवर कारवाई करता आलेली नाही. बेस्ट समितीवर अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी शिवसेनेचे नाना आंबोले यांची नियुक्ती झाली होती. मुंबईमधील बस स्टॉपवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण झाले आहे. मुंबईमधील अशा बस स्टॉपना मी भेटी देऊन अतिक्रमण मुक्त करणार आहे, असे सांगितले होते. आंबोले यांच्या कार्यकाळात बस स्टॉपवर कारवाई होत नव्हती. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कारवाई कधी करणार, असे विचारले असता, दिवाळी सण आहे, सण सुरू असताना कारवाई करणे योग्य नाही, सण संपला की कारवाई करू, असे सांगितले होते. आंबोले यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला तरी त्यांना कारवाई करता आलेली नाही. अशीच घोषणा त्यांच्यानंतर अध्यक्ष झालेल्या अनिल कोकीळ यांनी केली. त्यांनाही आपल्या कार्यकाळात अतिक्रमीत बस स्टॉपवर कारवाई करता आलेली नाही. बेस्टचे मुख्यालय असलेल्या कुलाबा आगारासमोरच असे बस स्टॉप आहेत. त्या बस स्टॉपजवळील फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. मग मुंबईत इतर ठिकाणी कशी कारवाई केली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे बस स्टॉप भेंडी बाजार, बांद्रा इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.

साचलेले पाणी आणि अस्वच्छता

साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करणारे प्रवासी, अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव, पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब, धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून काम करणारे कर्मचारी -अधिकारी वर्ग…अशा अवस्थेत ठाणे रेल्वे स्थानकासमोरील एसटी स्टॅण्ड सापडले आहे. एकीकडे स्मार्ट ठाण्याच्या गप्पा मारल्या जात असतानाच, दुसरीकडे असुविधेचे स्थानक बनलेल्या एसटी स्थानकाकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे ठाण्याच्या एसटी स्थानकाचे रूपडे कधी पालटणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिमेला कल्याण दिशेकडून बाहेर पडल्यानंतर समोरच एसटी स्टॅण्ड आहे. या स्टॅण्डवरून भिवंडी, माणकोली, वाडा, पनवेल, ओवळा, डहाणू, विरार, नालासोपारा, भाईंदर, बोरीवली, बोईसर, जव्हार, वसई, पालघर, अर्नाळा, पूर्णा, राबाडा या ठिकाणी बसेस सुटतात. रेल्वे स्टेशनच्या समोरच हे स्थानक असल्याने प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असते. या स्थानकातून बसेसच्या दररोज साधारण ६०० फेर्‍या होतात. पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत बससेवा सुरू असल्याने सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रवाशांची खूपच वर्दळ असते. अंदाजे ५ ते ६ हजार प्रवासी या स्थानकातून दररोज प्रवास करतात. मात्र त्या प्रमाणात प्रवाशांना येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे होते. काही दिवसांपूर्वीच हे खड्डे बुजविण्यात आले होते, उंच सखल रस्त्यामुळे या बस स्थानकात पाणी साचते.

- Advertisement -

उन्हा पावसाचा प्रवाशांना फटका

प्रवाशांच्या सोयीसाठी जरी स्टिलची आश्रय स्थानके उभारण्यात आली असली, तरी शहरात सुमारे तीन हजार बस थांबे हे खांबाच्या स्वरुपातच आहेत. या खांब्यांच्या स्थानकांकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष असून यातील अनेक खांब्यावर बेस्ट बसेसचे क्रमांक दिसेनासे झाले आहेत. त्याचेच उदाहरण आणिक डेपो जवळील एका खांब्यावर जवळ दिसून आले आहे. याठिकाणी बस स्थानकाचे नावदेखील नीट वाचता येत नाही. तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात याठिकाणी बसची वाट बघत प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. त्यामुळे प्रशासनाने याठिकाणी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी लावून धरली आहे. याठिकाणी गवतही वाढले असल्याने प्रवाशांना याही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

 

वडाळा, भक्तीपार्क येथील बस स्थानक 

बेस्ट प्रशासनाने मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात अनेक ठिकाणी स्टीलचे थांबे बसविले आहेत. प्रवाशांच्या या सोयीसाठी बसविण्यात आलेले हे थांबे सध्या डोकेदुखी ठरत आहेत. याचेच ज्वलंत उदाहरण सध्या वडाळा येथील भक्ती पार्क येथील बस स्थानक आहे. एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे या बस थांब्याची अवस्था झालेली आहे. या बस थांब्याजवळ प्रवाशांना जीव मुठीत घेऊन उभे रहावे लागते. अत्यंत भयानक ठिकाणी असलेल्या या बस थांब्याचे अनेक रॉड तुटलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना घाईच्या वेळी जाताना दुखापत होण्याची शक्यता आहे. या तुटलेल्या बस थांब्याजवळ पार्किंगदेखील केली जाते. बेस्ट प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचे परिणाम मात्र प्रवाशांना भोगावे लागत आहेत.

शेडअभावी प्रवासी उन्हात…

पूर्व द्रुतगतीच्या मुलुंडला जाणार्‍या मार्गिकेवर विक्रोळी पोलीस ठाण्याजवळ असलेला विक्रोळी बस थांबा हा पूर्वी पुलाखाली सावलीमध्ये होता. परंतु बेस्ट प्रशासनाने तो काही दिवसांपूर्वी उन्हामध्ये नेऊन ठेवला आहे. या जागेवर व्यवस्थित बस स्टॉप उभारणे शक्य असतानाही येथे फक्त खांब रोवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात व पावसात बसची वाट पाहत उघड्यावर उभे रहावे लागते. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. या ठिकाणी शेड उभारा किंवा स्टॉप पुन्हा पुलाखाली नेण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या मार्गावरून मुलुंड, ठाणे, भांडुप, नवी मुंबई, पवई येथे जाण्यासाठी प्रवासी बस पकडतात. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे बाबासाहेब शिरसाट यांनी हा थांबा हलवल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

झाडाझुडपांनी वेढलेले थांबे

बस थांबा हा प्रवाशांना लगेच दिसावा अशा पद्धतीने उभारावा, असे असले तरी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड व टागोर नगर क्रमांक 3 येथे असलेले बस थांबे हे झाडाझुडपांनी वेढलेले आहेत. त्यामुळे तेथे बस थांबा आहे की झाडेझुडपे हेच कळत नाहीत. प्रवाशांना बसथांब्याऐवजी रस्त्यावरच उभे राहावे लागते. या मार्गावरून पवई, कांजूरमार्ग, चांदवलीला जाण्यासाठी प्रवासी बस पकडतात.

धोकादायक बसथांबा

 

कांजूरमार्ग येथील एलबीएस मार्गावर असलेल्या डॉकयार्ड वसाहत या बस थांब्यावरून प्रवासी सकाळच्या वेळी अंधेरी, पवई, जोगेश्वरी, गोरेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात जातात. परंतु या बसथांब्यावरील पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. तेथे बसवण्यात आलेला थांबा हा पट्टीवर नटबोल्टने बसवलेला आहे, त्यामुळे त्याचा आश्रय घेताना नागरिकांना भीती वाटते. तसेच पेव्हर ब्लॉक नसल्याने पाऊस पडल्यावर तेथे चिखल साचतो. या मार्गावरून 27, 302, 303, 408, 306, 399, 494 अशा बर्‍याच बस जातात. तसेच या थांब्यांच्या मागील बाजूला हॉटेल आहे. तिथे जाण्यासाठी अनेकजण बसथांब्यावर मोठ्याप्रमाणात गाड्या उभ्या करतात. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर जाण्यासाठी अडचणी येतात.

बसथांब्यावर घाणीचे साम्राज्य

भांडुपमधील मंगतराम पेट्रोल पंप बसथांबा हा नेहमीच वर्दळीचा असतो. जवळच असलेल्या महापालिका कार्यालयामुळे येथे अनेकजण आपल्या तक्रारी घेऊन येत असतात. या बसथांब्यांच्या मागे काम सुरू असल्याने तेथे पत्रे लावण्यात आले आहेत. बसथांबा व पत्र्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या घाणीमुळे प्रवाशांना येथे उभे राहण्यास खूप त्रास होतो. त्यामुळे प्रवासी बसथांब्याऐवजी रस्त्यावरच उभे राहतात. या बसथांब्यावर भटकी कुत्री बसलेली दिसतात.

बसथांबाच अडगळीत

आयआयटी मार्केट परिसरातील हा बसथांबा पवई व आयआयटी परिसरात राहणार्‍या नागरिकांसाठी फार महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या बसथांब्यावर ठेवण्यात आलेल्या मोठ्या लोखंडी साहित्यामुळे हा बसथांबा अडगळीत पडला आहे. लोखंडी सामान व जवळच असलेल्या गॅरेजमुळे बसथांब्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे बस थांब्यापासून बरीच दूर उभी करावी लागते. प्रवाशांनाही रस्त्यावरच बसची वाट पाहत थांबावे लागते.

बेस्टच्या प्रमुख आगारासमोर दुरवस्था

मुंबईतील बेस्टचे प्रमुख आगार असणार्‍या परिसरातच बेस्टच्या बस स्टॉपची अवस्था दयनीय आहे. कुलाबा परिसरात नेव्ही नगर रोडवर असणार्‍या अनेक बस स्टॉपवर सध्या तिथल्या आजूबाजूच्या फुटपाथवरच्या दुकानांनी कब्जा केला आहे. विशेष म्हणजे बेस्टच्या प्रमुख आगार भवनासमोर अशी स्थिती असूनसुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कुलाबा आगार ते रिगल चित्रपटगृहापर्यंत असणारे कुलाबा बस स्थानक ते श्यामाप्रसाद चौक बसस्थानक हे सगळे फॅशनेबल दुकानांच्या वस्तूंनी झाकोळले आहेत. त्यामुळे बसस्टॉप नेमका कुठे आहे ते कळत नाही.

बस स्टॉपची दुरवस्था पाहून खूप वाईट वाटातं. जेव्हा पण बससाठी बस स्टोपवर जातो तेव्हा तिथे फक्त एक खांब आहे जिथे सर्व नंबर लिहले आहेत. उन्हात तर त्रास होतोच मात्र पावसाळ्यात तर अधिकच त्रास होतो कारण वरती कोणतेही छप्पर नसताना तिथे छत्री घेऊन उभा रहावा लागत.
– केतन लकूम, विद्याविहार

बस स्टॉप वर कोणत्याही प्रकारचे छपरं नसल्यामुळे खूप त्रास होतो. मोठ्यांचा तर ठीक आहे मात्र शाळेत जाणारे मुलांना देखीलभर पावसात तिथेच थांबवा लागत. या मुले त्यांची तबियत बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे.
-स्नेहल कदम, माझगाव

आमच्या इथे बस स्टॉप तर आहे, मात्र त्यामध्ये काही लोकांनी त्याचा चक्क घर केले असल्याचे दृश्य आहे. कपडे, भांडी, जेवण आणि स्वच्छतेमुळे त्या रस्त्यांची पूर्ण रस्ता खराब झाले आहे. तो बस स्टॉप आहे कि घर यावर तर कधी कधी शंकाच वाटते.
-अभिषेक महाडिक, प्रभादेवी

बस स्टॉप तर आहे मात्र तुटलेले बाकडे मुळे मोठी दुरवस्था झाली आहे. बस स्टॉप तर आहे मात्र आधीच यात बाकडे नाही तर पावसात छत गळतीमुळे तिथे उभे राहून सुद्धा भिजावं लागतं या मुले लोकांची मात्र मोठी तांबळ उडते .
– प्रवीण लीगम, कॉटन ग्रीन

बस स्टॉप तर मात्र त्यावर कोणीहि झोपलेले असतात. रात्रीच्या वेळीस तर चक्क गर्दुल्ले बसतात तिथे म्हणून रात्री येणार्‍या स्त्रियांच्या सुरुक्षितेवर प्रश्न चिन्ह येतो.
– अदिती कोळी, वडाळा

 

मुंबईतील बेस्टचे थांबे.

बेस्ट आगार – २८
बस आश्रय स्थानक – ३०००
बस थांबे (खांबे ) – ३०००

बेस्ट प्रवासी संख्या

१९९९ – २००० – ४५ लाख ४९ हजार
२००० – २००१ – ४१ लाख ४१ हजार
२०११ – २०१२ – ३९ लाख ६१ हजार
२०१२ – २०१३ – ३८ लाख ६१ हजार
२०१३ – २०१४ – ३५ लाख ८० हजार
२०१४ – २०१५ – ३३ लाख ८० हजार
२०१५ – २०१६ – २८ लाख ९९ हजार
२०१६ – २०१७ – २१ लाख ९९ हजार

 

 

(सर्व छायाचित्र : संदीप टक्के , संकेत शिंदे )

संकलन – अजेकुमार जाधव, विनायक डिगे, सौरभ शर्मा, संतोष गायकवाड, अक्षय गायकावाड, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, धवल सोलंकी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -