बंद टाकीतील गॅस बेतला कामगाराच्या जीवावर

सुरक्षा नसल्याकारणाने अनेकदा अशा गोष्टी होतात. पण, पाण्याच्या टाकीत उतरून गुदमरल्यामुळे पहिल्यादांच अशी घटना घडली आहे.

Mumbai
बंद टाकीतील गॅस बेतला कामगाराच्या जीवावर

माहिमला एकत्र कुटुंबात राहणारे ४५ वर्षीय राकेश निजम यांचा ग्रँटरोडच्या पाण्याच्या टाकीत उतरले असताना त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. राकेश निजम यांच्या मृत्यूमुळे निजम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकट्या कमावणाऱ्या राकेश यांचा गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे. शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. राकेश हे गेली दहा वर्षे गावदेवीच्या पाणी विभागाच्या मेंटेनन्स विभागात काम करत होते. राकेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे.

कामगारांना दोन शिफ्टमध्ये काम असल्याने राकेश निजम हे शनिवारी सेकंड शिफ्टमध्ये कामाला होते. पण, अचानक आलेल्या फोन कॉलमुळे त्यांना ग्रँटरोडच्या टाकीच्या कामासाठी जावे लागले. या टाकीत लिकेज असल्याकारणामुळे टाकीत उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण, टाकी काही काळापासून बंद होती. त्यामुळे त्यातून गॅस बाहेर आला आणि राकेश गुदमरले. त्यांचा श्वास कोंडला. राकेश यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, असे राकेश यांचे मोठ्या भावाने राजेश निजम यांनी सांगितले.

टाकीत उतरून गुदमरल्याची पहिली घटना

सुरक्षा नसल्याकारणाने अनेकदा अशा गोष्टी होतात. पण, पाण्याच्या टाकीत उतरून गुदमरल्यामुळे पहिल्यादांच अशी घटना घडली असल्याचे गेले ३४ वर्ष महापालिकेच्या गँग यार्डमध्ये काम करुन निवृत्त झालेल्या राकेश निजम यांच्या सहकाऱ्याने सांगितले. राकेश यांच्यासोबत उतरलेल्या आणखी ४ जणांवर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या चौघांचीही प्रकृती आता स्थिर असून सुरेश पवार यांना एमआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पवार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याकारणामुळे एमआयसीयूमध्ये ठेवण्यात आले असल्याचे नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केलं आहे.

” पाण्याच्या टाकीतून तात्काळ निघालेल्या गॅसमुळे कामगार गुदमरले. त्यातील राकेश यांना श्वास घ्यायला खूप त्रास झाला. त्यातून त्यांचा मृत्यू झाला असावा. तर, ४ जणांची प्रकृती आता स्थिर आहे. पवार यांना एमआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांनाही श्वास घ्यायला त्रास होत होता. तर, एक कामगार घाबरला आहे. पण, प्रकृती स्थिर आहे. ”
डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर हॉस्पिटल

राजकारण्यांची भेट

ग्रँटरोडच्या टाकीत गुदमरलेल्या महापालिकेच्या कामगारांची रविवारी शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंपासून महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशंवत जाधव यांनी नायर हॉस्पिटल गाठले.

यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले की, ” टाकीत उतरलेले दोन कर्मचाऱ्यांपैकी कोणी बाहेर आले नाही म्हणून आणखी दोघं कामगार टाकीत उतरले. त्यांना टाकीत घुसमटल्यासारखे झाले. पुन्हा शिडीवर चढत असताना राकेश खाली पडले. कदाचित त्यांचा श्वास कोंडला असावा किंवा त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा. त्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.