घरमुंबईकुर्ल्याचा युट्यूब स्टार दानिश झेहनचा कार अपघातात मृत्यू

कुर्ल्याचा युट्यूब स्टार दानिश झेहनचा कार अपघातात मृत्यू

Subscribe

‘एम टीव्ही ‘ वरील लोकप्रिय शो ‘एस ऑफ स्पेस’ मधील स्पर्धक युट्यूब स्टार दानिश झेहन याचा गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास सायन पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे कार अपघातात मृत्यू झाला. कुर्ल्यातील एका चाळीत राहणारा २१ वर्षाचा युट्यूब स्टार दानिश हा सोशल मीडियावर मागील एका वर्षात अधिक लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियावर जगभरात लाखो तरुण-तरुणी दानिशचे फॉलोअर्स असून अल्पावधीतच तो सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

कुर्ला पश्चिम पाईप रोड येथील मायकल चाळीत राहणारा दानिश झेहन हा लहानाचा मोठा या चाळीतच झाला. दानिशचे वडील एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यालयात नोकरीला असून दानिशचा मोठा भाऊ नोकरी निमित्त दुबईत असतो. दानिश हा मागील चार वर्षांपासून सोशल मीडियावर एक्टिव्ह होता, त्याने स्वतःचे आगळेवेगळे व्हिडिओ तयार करून युट्युबवर टाकण्यास सुरुवात केली होती. अल्पवधीतच त्याच्या व्हिडिओला हजारो लाईक मिळू लागले होते. हळू हळू तो युट्युब शिवाय इन्स्टाग्राम, टिकटॉक, सोशल साईटवर आपले व्हिडिओ, फोटो टाकून काही वर्षात तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला होता. दानिश याचे मुंबईतच नाही तर संपूर्ण जगात फॉलोअर्स तयार झाले होते. त्याची लोकप्रियतेला बघून ‘जिलेट’ कंपनीने त्याला डिजिटल ब्रँड अम्बेसिडर केले होते. त्यानंतर त्याला ‘एम टीव्ही’ वरील लोकप्रिय शो ‘एस ऑफ स्पेस’ मधील स्पर्धक म्हणून त्याची निवड झाली होती.

- Advertisement -

कर्जत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

कसा झाला अपघात

दानिश हा मागील एक वर्षांपासून नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी स्वतःचा घर घेऊन एकटाच राहत होता.बुधवारी तो एका मित्राचे लग्नासाठी सांताक्रूझ कलीना येथे आला होता, रात्री उशिरा तो स्वतःच्या मोटारीने एका मित्रांसोबत वाशी येथे जाण्यासाठी भरधाव वेगाने जात असताना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास सायन पनवेल रोड, मानखुर्द येथे एका खांबाला दानिशची मोटार वाटेतील एका दगडालावरून हवेत उडून विजेच्या खांबाला धडकली.हा अपघात एवढा भीषण होता की,मोटार पूर्णपणे चक्काचूर होऊन दानिशचा जागीच मृत्यू झाला. दानिशसोबत असणारा त्याचा मित्र समीर शहजाद हा गंभीर जखमी झाला.

या अपघाची माहिती मिळताच अपघातस्थळी आलेल्या मानखुर्द पोलिसांनी दानिश आणि समीर या दोघांना मोटारीतून बाहेर काढून शताब्दी रूग्णालय आणले असता डॉक्टरांनी दानिशला मृत घोषित केले व समीरला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दानिश याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूला जबाबदार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली.

- Advertisement -

दानिशच्या घरी पोहोचले हजारो फॉलोअर्स

दानिश झेहन याचा अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच, कुर्ला येथील दानिशच्या घरी सकाळपासून हजारो फॉलोअर्सवरची रीघ लागली होती. या फॉलोअर्सवर मध्ये १२ ते ३० वयोगटातील तरुण तरुणीचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. दानिशच्या अपघाती मृत्यू मुळे त्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अनेक तरुण तरुणीना आपले अश्रू अनावर झाले.

माझ्या मुलाला दृष्ट लागली

दानिशचे शव गुरुवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर कुर्ला येथील घरी आणण्यात आले होते.दानिशचे मृत शरीर बघताच आईने हंबरडा फोडला, माझा मुलाला सर्वांची दृष्ट्य लागली, त्याला मोठे स्टार व्हयचे होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -