घरमुंबईसंरक्षक भिंतीशेजारील झोपड्यांवर पावसानंतर कारवाई

संरक्षक भिंतीशेजारील झोपड्यांवर पावसानंतर कारवाई

Subscribe

सर्व विभागीय सहायक आयुक्त, प्रमुख अभियंत्यांना यादी बनवण्याचे आयुक्तांचे निर्देश

मालाड पिंपरीपाडा येथील जलाशयाची भिंत झालेल्या दुर्घटनेनंत मुंबईतील महापालिकेच्या हद्दीतील सर्व उंच संरक्षक भिंतींशेजारी असलेल्या झोपडपट्टयांची पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. अशाप्रकारच्या सर्व झोपडपट्ट्यांचा सर्वे करून त्यांची यादी तयार करून येत्या पावसाळयानंतर त्यावर कारवाई करण्यात यावी तसेच ज्या भागातील भिंती अत्यंत धोकादायक असल्याचे वाटल्यास त्यांचे त्वरीत अन्य जागांवर स्थलांतर करण्यात यावे,अशाही सूचना आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्त व उपायुक्तांसह प्रमुख अभियंत्यांना दिल्या आहेत.

मालाड पूर्व पिंपरीपाडा येथील मालाड जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचे बळी गेले आहेत. तर जखमी झालेल्यांपैंकी ७२ जणांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. महापालिकेने या भिंत दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आयआयटी व व्हिजेटीआयच्या निवृत्त अभियंत्यांची एक तज्ज्ञ समिती गठीत केली आहे. तसेच भिंतीचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.

- Advertisement -

मात्र, मालाड येथील भिंत दुर्घटननेनंतर मुंबईत पावसाळ्यात अशाप्रकारची दुसरी घटना घडू नये याची काळजी महापालिका प्रशासन घेत आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी, या दुर्घटनेच्या पाश्वभूमीवर महापालिकेचे सर्व सहायक आयुक्त व उपायुक्त तसेच जलअभियंता, मलनि:सारण खाते, घनकचरा व्यवस्थापन आदी खात्यांच्या प्रमुखांना सूचना देत महापालिकेच्या हद्दीतील बांधण्यात आलेल्या सर्व भिंतींशेजारील झोपड्यांची यादी तयारी करण्याचे निर्देश दिले. सहायक आयुक्तांनी तसेच खातेप्रमुखांनी आपापल्या हद्दीतील संरक्षक भिंती आणि त्याशेजारील झोपड्यांची यादी तयार करून त्या पावसाळ्यानंतर हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच ज्या भिंती धोकादायक असल्याचे दिसून आल्यास त्याच्या आसपासच्या झोपड्यांमधील रहिवाशांना त्वरीत स्थलांतर करण्यात यावे,अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांकडून मिळत आहे.

- Advertisement -

अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) प्रविण दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयुक्तांनी अशाप्रकारच्या निर्देश दिले असून त्याप्रमाणे सहायक आयुक्त व खातेप्रमुख प्रथम यादीत तयार करेल. त्यानंतर पावसाळ्यानंतर त्या झोपड्या हटवण्याची कार्यवाही केली जाईल. परंतु जर भिंत अत्यंत धोकादायक असेल तर तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या सूचना केल्या जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -