अतिक्रमणांवरील कारवाईचा दणका 

167 हातगाड्या, 29 टपर्‍या, 321 बांधकामे जमीनदोस्त

Mumbai

ठाणे अतिक्रमणमुक्त फुटपाथ, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील कारवाईच्या तिसर्‍या दिवशी देखील महापालिकेची धडक कारवाई सुरूच असून जवळपास 167 हातगाड्या, 29 टपर्‍या,12 फेरीवाले,12 पोस्टर्स, 23 बॅनर्स आणि 321 फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये गुरुवारी कारवाई करण्यात आली. आज शुक्रवारीही ही कारवाई सुरूच राहणार आहे.

गेले दोन दिवस ठाणे शहरामध्ये विविध परिसरात अतिक्रमण कारवाई जोरात सुरू असून कारवाईच्या आजच्या दिवशीदेखील शहरातील विविध परिसरातील टपर्‍या, पोस्टर्स व फुटपाथवरील बांधकामे निष्कासित करण्यात आली. गुरुवारी 167 हातगाड्या, 29 टपर्‍या,12 फेरीवाले,12 पोस्टर्स, 23 बॅनर्स आणि 321 फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाई अंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील 43 हातगाड्या, 12 पोस्टर्स, 23 फुटपाथवरील अतिक्रमणे, दिवा प्रभाग समितीमध्ये 18 हातगाड्या,27 फुटपाथवरील अतिक्रमणे, माजिवडा प्रभाग समितीमध्ये 04 फुटपाथवरील अतिक्रमणे, 21 हातगाड्या, 3 बॅनर्स, वर्तकनगरमध्ये 53 फुटपाथवरील अतिक्रमणे, 27 हातगाड्या, नौपाडा प्रभाग समितीमध्ये 25 फुटपाथवरील अतिक्रमणे, 7 हातगाड्या, लोकमान्य परिसरात 55 फुटपाथवरील अतिक्रमणे, 16 हातगाड्या, 2 टपर्‍या, कळवा प्रभाग समिती 25 फुटपाथवरील अतिक्रमणे,13 हातगाड्या, दिवा प्रभाग समितीमध्ये 27 फुटपाथवरील अतिक्रमणे, 18 हातगाड्या, उथळसर प्रभाग समितीमध्ये 11 हातगाड्या,26 फुटपाथवरील अतिक्रमणे तर मुंब्रा प्रभाग समितीमधील 32 हातगाड्या,14 लाकडी बाकडे, 12 लोखंडी स्टॅन्ड, 11 पानटपरी, 4 उसाच्या रसाच्या गाड्या, 6 कोंबडी पिंजरे, 3 शोरमा गाडी, 8 बॅनर्स, 1 सिलिंडर, 4 स्टील काउंटर, 22 ठेले,37 वेदर शेड हटवण्यात आल्या आहेत.

अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
सिडकोच्या नैना विभागातर्फे गुरुवारी पनवेल तालुक्यातील काळोखे, शिरढोण, चिंचवण गाव येथील विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई करण्यात आली. यावेळी बेकायदा पत्र्याचे शेड, अतिक्रमणे, दुकाने हटवण्यात आली. कोळखे गावातील अनधिकृत बांधकाम, एक मिठाईचे दुकान, धाबा, कंटेनर यार्डातील अतिक्रमण, पत्र्याचे शेड आदी अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. निष्कासन मोहिम राबवण्याकरीता 30 कामगार तैनात करण्यात आले होते. एक मॅन्युअल ब्रेकर, हातोडा, 1 ट्रक, 10 जीप, 4 क्राँक्रीट ब्रेकर, 2 पोकलेन, 2 टोइंग व्हॅन इत्यादी यंत्रसामुग्री वापरण्यात आली.