२८५ रेल्वे तिकीट दलालांवर कारवाई

 प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक, रेल्वे पोलिसांनी कसली कंबर

Mumbai

लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने एकूण २८५ दलालांना पकडले आहे. तर २ लाख ३६ हजार ५०० रुपये या दलाकडून दंड वसूल करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने अशा दलालांची तक्रार करण्याकरिता प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर फिरणारे दलाल आता रेल्वे सुरक्षा दलाच्या भीतीमुळे रेल्वे स्थानकांवरून दिसनासे झाले आहेत.

अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तात्काळ तिकीट मिळविण्यासाठी अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात.त्यामुळे प्रवाशाना तिकीट मिळत नाही. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाची विक्री करण्यासाठी दलाल तिकीटघरासमोर असतात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांकडून या दलालांचा आधार घेत तिकीट घेण्यात येते. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने कंबर कसली असून अशा दलालांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तसेच यावर्षी रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते मार्च २०१९ पर्यंत ५२ तिकीट दलाला पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दलालांकडून ७१४ रेल्वे तिकीटे जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर ३५ हजार रुपयाच्या दंड ठोठावला आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून दिलेल्या माहिती नुसार २०१८ मध्ये २१३ दलाला विरोधात तक्रारी आल्या होत्या. तेव्हा रेल्वे पोलिसांनी २३३ रेल्वे तिकीट दलाला पकडून त्यांच्याकडून १० हजार २२० तिकिटे जप्त केली आहेत. तसेच या दलालाकडून २ लाख ५१ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

दलालांची तक्रार करा व्हॉट्सअ‍ॅपवर
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वेच्या तिकीट दलालांची तक्रार करण्याकरिता प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. ९९८७६४५३०७ या हेल्पलाइन क्रमांकावर दलालाची तक्रार दाखल केली जाऊ शकते. यासह दलालाचा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही पाठवू शकतात. त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.