घरमुंबईभाईंदरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर कारवाई

भाईंदरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर कारवाई

Subscribe

नरेंद्र मेहतांच्या निकटवर्तीयाचे बांधकाम जमीनदोस्त,नवनियुक्त आयुक्तांचा मेहतांना दणका

गेली पाच वर्षे मीरा-भाईंदरवर सत्तेच्या माध्यमातून विरोधकांवर वरचढ झालेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांना राज्यात सरकार बदलल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असेच चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. मेहतांच्या निकटवर्तीयांच्या हॉटेलने चोरलेला तलाव परत मिळाला असतानाच आता नवनिर्वाचित आयुक्तांनी रस्त्यालगत बेकायदेशीरपणे बांधलेल्या 25 गाळ्यांवर बुलडोझर फिरवून मेहतांना दणका दिला आहे.

काशीमिर्‍यातील मिरा-भाईंदर रोडवरील मौजे मिरे येथील सर्व्हे नंबर 16, 5 व 7 या जागेवरील बेकायदा पत्राशेड व बांबूच्या साहाय्याने बस्तान बांधून दुकाने थाटली होती. ही दुकाने मेहता यांचे निकटवर्तींयाच्या 711 कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधली होती. नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पदभार सांभाळताच त्यांनी आपला पहिला हातोडा या अनधिकृत दुकानांवर मारण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने बुलडोझर फिरवत दुकाने जमीनदोस्त केली.
बिल्डर जयराज देविदास यांनी या जागेमधील काही भाग नरेंद्र मेहता यांच्या निकटवर्तीय असलेल्या कंपनीला विकला होता. जागा विकत घेतल्यानंतर संपूर्ण जागेवर पोलीस बंदोबस्त घेऊन कब्जा घेतला होता. त्या जागेचा वाद चालू असताना समोरच्या व्यक्तीवर काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याजागेमध्ये कब्जा मिळवला होता. नंतर याच ठिकाणी 711 कंपनीने संपूर्ण रोडसाईड जागा व्यापत त्याठिकाणी दुकाने थाटली होती. त्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दबावापोटी कोणतीही कारवाई केली नव्हती.

- Advertisement -

चंद्रकांत डांगे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ही दुकाने तोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण, सुदाम गोडसे, इंजिनिअर संदीप साळवे, प्रशांत जानकर, विशाल देवरे, योगेश भोईर आणि दुर्गदास अहिरे यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात 25 दुकाने जमिनदोस्त केली. ही दुकाने हजारो रुपयांच्या भाड्याने दुकानदारांना देण्यात आली होती.

दरम्यान, महापालिकेत भाजपचे सत्ता असून नरेंद्र मेहता आमदार असताना त्यांनी शहरात कब्जा मिळवत विरोधकांना जेरीस आणले होते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि मेहता यांच्यात तर वारंवार खडके उडत असत. महापालिकेतही शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होत होता. विधानसभेत मेहता यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकारही गेले. त्याचे परिणाम आता मेहतांना जाणवू लागले आहेत. याच आठवड्यात मेहतांच्या निकटवर्तीय कंपनीच्या हॉटेलने चोरलेला तलाव परत मिळाला. तत्कालीन महापालिका आयुक्त आणि महसूल विभाग तक्रार करूनही चोरीला गेलेल्या तलावाचा शोध घेत नव्हते. सत्तांतरानंतर तलाव मिळाला आणि लगोलग आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून मेहतांना दणकाही दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -