अनधिकृत हातगाडीवरील गॅस सिलिंडरवर कारवाई सुरू

Mumbai
गॅस सिलिंडरवर कारवाई करताना

कल्याण -डोंबिवलीत अनधिकृतपणे हातगाडी आणि चायनीज गाडीवरील गॅस सिलिंडरवर अखेर महापालिका प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. कल्याणच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतरही पालिकेला जाग नाही. ‘कल्याण -डोंबिवलीकरांचा जीव धोक्यातच …’ या मथळखाली बुधवारी ‘आपलं महानगर’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.

कल्याणातील एका अनधिकृत चायनिज हॉटेलला लागलेली आग विझवत असतानाच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाच्या जवानाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेनंतर अनधिकृत हातगाडीवरील गॅस सिलिंडरचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. कल्याण -डोंबिवली शहरात जागोजागी व वर्दळीच्या ठिकाणी चायनीज आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या थाटल्या आहेत. या हातगाड्यांवर सर्रासपणे बेकायदा सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र तरीही पालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती.

अखेर गुरुवारपासून पालिका प्रशासनाने कल्याण -डोंबिवली दोनही शहरात रस्त्यावरील हातगाडी पाणी पुरी चायनीज आणि चहा टपरी यांच्यावर धडक कारवाई करीत त्यांचे गॅस सिलिंडर जप्त केले. पालिकेच्या दहाही प्रभाग क्षेत्रात प्रभाग क्षेत्र अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणारे हातगाडया चायनीज गाड्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र ही कारवाई सातत्याने सुरू राहावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here